जिल्हा पातळीवर हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मक-उपमुख्यमंत्री अजित पवार

0 झुंजार झेप न्युज

•जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत योजनांचे तांत्रिक मान्यतेचे राज्यस्तरीय अधिकार 

•कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा बैठकीतील निर्णयांचा उपयोग राज्यातील अन्य जिल्ह्यांनाही होणार

कोल्हापूर,दि.17: जिल्हा वार्षिक योजने (सर्वसाधारण) च्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हा स्तरावर हस्तांतरित करणे, राज्यस्तरीय योजनांचे जिल्हा वार्षिक योजनेत हस्तांतरण झाल्यामुळे या प्रमाणात निधीत वाढ करणे, शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित शासकीय रुग्णालयांचे बांधकाम विस्तारीकरण, दुरुस्ती व औषधसाठा यासाठी निधी उपलब्ध करून देणे, राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेतून 2-4-6 संकरित दुधाळ गाई म्हैशी गट वाटप योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांचा समावेश करणे, पोलीस व तुरुंग विभागाला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणे आदी विषयांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत निधी वाटपाचे निकष, योजनांच्या तांत्रिक मान्यता, अनुज्ञेय कामे, स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणे आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.कोल्हापूर मधून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेले सर्व विषय अभ्यासपूर्ण असून राज्यस्तरावर राबवण्याजोगे आहेत. त्यांनी मांडलेल्या विषयांबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 चे प्रारुप आराखडे अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 25 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हयासाठी निधी वाटप निकषानुसार 400 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी निधी वाटपाचे सध्या लागू असणाऱ्या निकषाचे सूत्र बदलून राज्याला जास्त उत्पन्न मिळवून देणा-या कोल्हापूर सारख्या जिल्हयांना अधिक निधी उपलब्ध करुन दयावा, अशी सुचना करुन कोल्हापूर जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक जास्त असल्यामुळे जिल्हयाला कमी निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले होते. आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, निधी वाटपाच्या सुत्रामध्ये शहरी लोकसंख्येचा देखील विचार करण्यात आला आहे, त्यानुसार कोल्हापूर जिल्हयाच्या वार्षिक योजना आराखडयासाठी 425 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच ज्या जिल्हयांचा निर्देशांक जादा आहे, विकासाचा दर जादा आहे, त्या जिल्हयांना कमी निधी मिळणार नाही, अशा पध्दतीने निधी वाटप सुत्रामध्ये बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कोल्हापूर येथून आवश्यक ती माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.