अमरावतीत लवकरच साकारणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदगावपेठेत जागा निश्चित-पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

0 झुंजार झेप न्युज

अमरावतीत लवकरच साकारणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदगावपेठेत जागा निश्चित-पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

अमरावती: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदगावपेठ येथील १८.५३ हेक्टर जागेवर उभारण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सुस्पष्ट सूचना केल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यासाठी जागेची निश्चिती झाली असून, चार सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सूचनांनुसार सुसज्ज महाविद्यालय आकारास येणार आहे. अमरावती जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर यामुळे पडणार आहे, असा विश्वास पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी २०१७ पासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाने (डीएमईआर) २०१९ मध्ये समिती स्थापन केली. जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यामुळे जानेवारी, २०२१ मध्ये हा विषय कॅबिनेटपुढे येऊन सकारात्मक चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. आता जागेचाही प्रश्न सुटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.

नांदगावपेठेत जागा निश्चित

अमरावती येथील 'नांदगाव पेठ' मधील सुमारे १८.५३ हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नियुक्त

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी समन्वय अधिकारी व तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पराते यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.तारकेश्वर गोडघाटे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.व्ही.आय. खंडाईत यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून डॉ.विजय शेगोकार यांच्याकडे, तर प्रशासकीय कामकाजात मदत करण्यासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 'राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा'च्या (एनएमसी) निकषानुसार प्रस्तावित जागा, नियोजित रचना आदींबाबत अहवाल सादर करण्याचाही सूचना समितीला आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.