उद्याची सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार

0 झुंजार झेप न्युज

उद्याची सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती,दि.27: उद्याची सुसंस्कृत आणि सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक असे शिक्षण द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.वाघळवाडी येथील राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अर्थसहाय्यीत मु. सा. काकडे महाविद्यालय नूतन इमारत व सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, रुसाचे राज्य प्रकल्प संचालक निपूण विनायक, माजी खासदार राजू शेट्टी, सुनेत्रा पवार, प्रमोद काकडे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, शामराव काकडे देशमुख, विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य विद्यापीठ राजेश पांडे, डॉ. सुधाकर जाधवर, सहसंचालक उच्च शिक्षण डॉ. किरण कुमार बोदर, डॉ सोमनाथ पाटील, रुसाचे उपसंचालक प्रमोद पाटील, शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, प्राचार्य डॉ.देविदास वायदडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले , आनंदाचा निर्देशांक कसा वाढेल यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायला हवे. उद्याची चांगली पिढी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक असे शिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यवहारी बनणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रातही नैपुण्य मिळवावे आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे, त्यामुळे ते जीवनात यश संपादन करू शकतील. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाचे शिक्षण घेवून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा जेणेकरून इतरांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो असेही ते म्हणाले. 

 मु. सा. काकडे महाविद्यालयाला ५० वर्षाची कारकीर्द आहे. १५ एकर मध्ये वसलेला महाविद्यालयाचा परिसर खूपच सुंदर आहे असे सांगताना संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक वर्ग खूप चांगल्या प्रकारे काम करून चांगले विद्यार्थी घडवत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.डॉ.सोमप्रकाश केंजळे लिखित 'गरुडझेप' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 


वाघळवाडी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघळवाडी येथे आज एक लक्ष लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी, संत सावता माळी मंदिर ते अंबामाता मंदिर पेवर ब्लॉक रस्ता, ज्योतिबा मंदिर सभामंडप, अंबामाता मंदिर सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण इत्यादी कामांचे उद्घाटन केले. 

यावेळी झालेल्या सभेत श्री. पवार म्हणाले, वाघळवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नीरा बारामती रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नागरीकांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करू नये. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी एकजुटीने काम करावे त्यासाठी चांगल्या गावाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी पुनर्विलोकन एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, ग्रामविकास अधिकारी नरसिंग राठोड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.