एकल वापर प्लास्टीकच्या बंदीबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करावी-जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड
जालना,दि.23: पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी केंद्र शासनाच्या दि. 12 ऑगस्ट 2021 च्या अध्यादेशानुसार एकल वापर (सिंगल युज) प्लास्टीकवर दि. 1 जुलै 2022 पासून पूर्णत: बंदी घालण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हयात मोठया प्रमाणात जनजागृती करुन एकल वापर प्लास्टीकचा वापर कुणीही करु नये, याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आज एकल वापर प्लास्टीक बंदीबाबतच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस.एम. कुरमुडे, जालना, अंबड, घनसावंगी व परतुर नगर पालिकेचे मुख्याधिकारी , एमआयडीसीचे अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
एकदा वापरुन फेकण्यात येणाऱ्या प्लास्टीकला एकल वापर प्लास्टीक असे म्हटले जाते. या प्लास्टीकमुळे पर्यावरणाची मोठया प्रमाणात हानी होत आहे. याचा वापर थांबविण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारीत प्लास्टीक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार पुढील एकल वापर प्लास्टीक वस्तु प्रतिबंधित केल्या आहेत. यामध्ये सजावटीसाठी प्लास्टीक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, आंमत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टीक आवरणे, प्लास्टीकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टीकच्या काडया, प्लास्टीकचे झेंडे, कँडी कांडया , आईस्क्रीम कांडया, प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स), 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यांचा समावेश आहे. याबरोबरच महाराष्ट्र प्लास्टीक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत कंपोस्टबल प्लास्टीक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या प्लास्टीकच्या पिशव्या (कॅरी बॅग) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या आणि डिश बाऊल, कॅन्टेनर (डबे) प्रतिबंधित आहेत. राज्य शासनाने पूर्णत: एकल वापर प्लास्टीक बंदीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याची सूचना केली आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीत सूचना करताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, दि. 1 जुलै 2022 पासून जालना जिल्हयात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टीकवर पूर्णत: बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळासह, नगर पालिका, ग्रामपंचायत यांनी मोठया प्रमाणात जनजागृती करावी. याबाबत जनजागरण रॅली काढण्यात यावी. दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना कराव्यात. तसेच एकल वापर प्लास्टीकला पर्याय म्हणून पर्यावरणाला धोका नसणाऱ्या कापूस, बांबू, लाकडापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू वापरण्याबाबत माहिती दयावी. जनतेनेही एकल वापर प्लास्टीकचा वापर थांबवून पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

