स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान
ठाणे : स्वातंत्र्य मिळविण्यात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आहे. त्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात देश बलशाली करण्याचे श्रेय सैनिकांचे आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे काढले. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) उपक्रमा अंतर्गत दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह व राष्ट्रध्वज देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर बोलत होते. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) किरण सोनावणे, सेवानिवृत्त कमोडोर बी.बी.मिस्त्री, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, लेफ्टनंट कमांडर गिरीराज सिंग सोलंकी, फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, मानद सचिव ज्ञानु चोरगे, कोषाध्यक्ष निम्बा पाटील, श्री. दळवी आदी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांना तिरंगा ध्वज देण्यात आला. शहीद सैनिक रोहित शिंगाडे यांच्या कुटुंबीयांचाही यावेळी गौरव करण्यात आला. हौसिंग फेडरेशनच्या वतीने गृहनिर्माण सोसायट्यांना ध्वज वितरण करण्यात आले.
श्री.नार्वेकर म्हणाले की, देशाच्या अमृत महोत्सव निमित्त ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील सर्व घटकांना यामध्ये सामील करून घेण्यात येत आहे. त्याच बरोबर ठाणे टॉक च्या माध्यमातून माजी सैन्याधिकारी यांच्या बरोबर संवाद, ठाणे जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती लोकांना व्हावी यासाठीही संवाद कार्यक्रम होणार आहे. ऐतिहासिक ठाणे कारागृहाचीही माहिती देण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हरघर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात १७ लाख घरे व संस्थांवर तिरंगा लावण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हौसिंग फेडरेशनचे सहकार्य आवश्यक आहे, असेही श्री. नार्वेकर यांनी सांगितले.माजी सैनिकांना मालमत्ता करा मध्ये सवलत आहे. त्याबद्दल माजी सैनिकांना माहिती व्हावी यासाठी हौसिंग फेडरेशनने पुढाकार घ्यावा. जिल्हा प्रशासन त्यांना सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच माजी सैनिकांच्या सोसायटीच्या कन्व्हेयन्स चा प्रश्न सोडवण्यासाठीही सहकार्य करू, असेही श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) किरण सोनावणे म्हणाले की, माजी सैनिक राहत असलेल्या सोसायटीचे कन्व्हेयन्स करण्यासाठी येत्या तीन महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात येईल. तसेच सोसायटीतील तंटे सोडवण्यासाठी सहकार विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये माजी सैनिकांनी योगदान द्यावे. स्वच्छ ऊर्जा उपक्रम राबविण्यासाठीही माजी सैनिकांनी पुढाकार घ्यावा.सेवानिवृत्त कमोडोर बी.बी.मिस्त्री, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, लेफ्टनंट कमांडर गिरीराज सिंग सोलंकी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

