जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

0 झुंजार झेप न्युज

जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

पुणे,दि.5: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ यांच्याद्वारे जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त घरोघरी तिरंगा फडकवावा यासाठी अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तशी विक्री केंद्रेही विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने बचतगटातील महिला भगिनींनी तिरंगा ध्वज विक्री उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी या केंद्रावरून ध्वज घ्यावा आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी केले. 

आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वज विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत स्तरावरही ग्रामपंचायत तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंत्योदय तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याला ध्वज मोफत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. गावागावात जनजागृतीही सुरू आहे. झेंड्यांची सर्वत्र उपलब्धता असण्यासाठी विविध ठिकाणी केंद्रे सुरू होत आहेत.जिल्हा परिषदेच्या आवारात शिंदवणे ता.हवेली येथील अन्नपूर्णा महिला ग्राम संघाच्यावतीने झेंडा विक्री सुरू आहे. सुरुवातीला १५०० ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.