शुक्रवारपर्यंत तालुकास्तरीय बैठक घेऊन सूक्ष्म आराखडा तयार करण्याच्या सूचना
सोलापूर : ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत 26 डिसेंबरपासून नदी यात्रेचे नियोजन करावे. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी, नदी समन्वयक यांची शुक्रवारपर्यंत तालुका स्तरीय बैठक घेऊन सूक्ष्म आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण धीरज साळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) चारूशीला देशमुख – मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, नदी समन्वयक सर्वश्री वैजनाथ घोंगडे, रजनीश जोशी, डॉ. अनिल पेठकर, सूर्यकांत बनकर, दिनकर नारायणकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे तहसीलदार यांच्यासह बैठकस्थळी गटविकास अधिकारी, समितीचे सदस्य व नदीप्रहरी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत क्षेत्रीय स्तरावर झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील कासाळगंगा, भीमा, कोरडा, आदिला, दुबदुबी आणि माणगंगा नद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, 26 डिसेंबरपासून पाच दिवस नदी संवाद यात्रा सर्व ठिकाणी एकाच दिवशी सुरू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी हे अभियान राबविताना तालुका स्तरीय बैठकांमध्ये विविध टप्प्यांचे अभ्यासपूर्वक तातडीने नियोजन करावे. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी व नदी समन्वयक यांची महत्त्वाची भूमिका असून, त्यांनी परस्पर समन्वयाने रचनात्मक, परिणामकारक नियोजन करावे. नदी संवाद यात्रेदरम्यान वाहनांद्वारे प्रचार प्रसिद्धी करावी. मोठ्या गावांमध्ये सभा घेऊन नदीची माहिती द्यावी. नियोजन समितीमधून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, इच्छुक दात्यांचेही यामध्ये योगदान घ्यावे, असे ते म्हणाले.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे म्हणाल्या, या अभियानात तालुकास्तरीय बैठकांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व प्रभावी ग्रामस्तरीय नियोजन करावे. त्यासाठी त्यांना नोडल अधिकारी व नदी समन्वयक यांनी आवश्यक माहिती पुरवावी, असे त्या म्हणाल्या.यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समितीच्या सदस्यांची मते जाणून घेतली व आवश्यक सूचना केल्या. यावेळी नदी समन्वयक यांनी नदी संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी, त्यामध्ये अधिकाधिक लोकसहभाग मिळवण्यासाठी आवश्यक बाबी विषद केल्या.

