पोटनिवडणूक २०२३ च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप
पिंपरी चिंचवड,दि.22: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२३ च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप मतदान दिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच दि.२५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचा-यांना आज कामकाजासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.प्रारंभी, निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत सेक्टर अधिकारी आणि संगणक चालक यांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षण दिले. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने कर्तव्ये, जबाबदा-या आणि आवश्यक कामकाज याबद्दल या प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती आणि सूचना देण्यात आल्या. यावेळी निवडणूक समन्वयक प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड यांच्यासह निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेले सेक्टर अधिकारी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर उपस्थित होते.
यानंतर साहित्य स्विकृती आणि वाटप कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचा-यांना कामकाजासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. दि. २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचा-यांना विविध कामे सोपविण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप मतदान दिवसाच्या आदल्या दिवशी करण्यात येणार आहे. तर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे पार पडणार आहे. साहित्य वाटप करण्याकरीता १११ कर्मचारी तर स्वीकृतीसाठी १४८ कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचा-यांना निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय,थेरगांव येथील बापूजीबुवा सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी या प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन केले.
साहित्य वाटप व स्वीकृती कामकाज खूप जबाबदारीचे आणि काळजीपूर्वक करण्याचे काम आहे. प्रत्यक्ष निवडणूकीतील मतदानाच्या कामकाजामधील हा महत्वपूर्ण टप्पा असून ह्या कामात चूक झाल्यास संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. सर्व कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी,नियंत्रण पथक नियुक्त केली आहे. या कामकाजामध्ये हलगर्जीपणा न करता सर्वांनी समन्वयाने काम करावे,अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचा-यांना मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप आणि स्विकृतीचे काम सोपविण्यात आले आहे. दि.२५ फेब्रुवारी रोजीसकाळी ७ वाजेपासून साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात होणार आहे. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचा-यांची हजेरी घेणे, नमूद केलेल्या टेबल क्रमांकावर उपस्थित राहून नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष यांच्या ताब्यात देणे, याबाबतची नोंद साहित्य वाटप रजिस्टर मध्ये घेणे, मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र तसेच मतदान केंद्राचे साहित्य वाटप करणे, या सर्व बाबींची नोंद रजिस्टरला घेणे, आदी कामे वाटप कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांना सोपविण्यात आली आहेत.दि.२६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपासून साहित्य स्विकृतीच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. यामध्ये ईव्हीएम यंत्र ताब्यात घेणे, मतदान प्रक्रीयेविषयीचे विविध सीलबंद पाकीटे आणि लिफाफे, ताब्यात घेतलेल्या साहित्याच्या नोंदी करणे,ताब्यात घेतलेले साहित्य दिलेल्या सूचनेनुसार व्यवस्थितपणे ठेवणे, आदी जबाबदा-या साहित्य स्वीकृतीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांकडे सोपविण्यात आली आहेत.

