निश्चित; होणार्‍या विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आधीच केले त्यांचे अभिनंदन

0 झुंजार झेप न्युज

निश्चित; होणार्‍या विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आधीच केले त्यांचे अभिनंदन

पिंपरी चिंचवड,दि.23: चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निवडणूक निकालाच्या आधीच अभिनंदन केले आहे. मतदारांचा कल पाहता अश्विनीताई तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच विजयी सभेच्या रॅलीला मलाही बोलवा, अशी सूचना त्यांनी केली आहे.भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना, प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीतील शिवेंद्र लॉन्समध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या राज्याच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, प्रहारचे संजय गायखे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भारत महानवर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहप्रमुख तरस यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला नागरिकांची तुफान गर्दी होती. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी वाकडपासून काढलेल्या रोड शोलाही नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी रोड शो दरम्यान दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याविषयी नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या प्रेमाचा आणि आदराचा आवर्जून उल्लेख केला. मुख्यमंत्री असल्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीत काय होणार हे मला आधीच माहित असल्याचे ते म्हणाले. मतदारसंघातील मतदारांचा कल भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले.अश्विनीताई तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच निवडणुकीतील विजयासाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे आधीच अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच विजयी सभेच्या रॅलीला मलाही बोलवा, असे ते मिश्किलपणे बोलले. तुम्ही अश्विनीताईंना एक लाखाचे मताधिक्य देणार का?, असा जाहीर प्रश्न त्यांनी सभेला उपस्थित प्रचंड गर्दीला केला. त्यांच्या या प्रश्नाला नागरिकांनी हो असे उत्तर देऊन जोरदार प्रतिसाद दिला. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे आधीच विजयासाठी अभिनंदन केल्याने महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महायुतीतील सर्व नेते, आमदार, खासदार, मंत्री, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते चिंचवड पोटनिवडणुकीत प्रचंड कष्ट घेत असल्यामुळे अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.