शाश्वत विकास साध्य करणारा जिल्हा विकास आराखडा तयार करावा - डॉ.गव्हाणे

0 झुंजार झेप न्युज

शाश्वत विकास साध्य करणारा जिल्हा विकास आराखडा तयार करावा - डॉ.गव्हाणे

औरंगाबाद,दि.03: राज्य शासनाने राज्याचे 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलरच्या आर्थिक प्रगतीचे ध्येय ठरवले आहे. हे ध्येय साध्य करीत असताना जिल्ह्यांनी संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे शक्य होईल. असा विकास सर्वसमावेशक असेल आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यातही मदत करेल. त्या अनुषंगाने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य होण्यासाठी प्रत्येक विभागाने लघु, मध्यम, दिर्घ मुदतीचे विकास आराखडे तयार करुन जिल्हा प्रशासनास सादर करण्याचे निर्देश मा. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी दिले.

जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठीचे नियोजन तातडीने करण्याबाबत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, जिल्हा विकास आराखड्याचे तांत्रिक सल्लागार संजय देशमुख एमआयटी संस्था, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. भारत वायाळ, पर्यटन विभागाचे विभागीय उपसंचालक श्री.संजय जाधव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.प्रदीप झोड, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती करुणा खरात, कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य अभिजीत आल्टे यांच्यासह अशोक येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख, मसिआ चे प्रतिनिधी, उद्योग, पर्यटन, कृषि या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. पशुसंवर्धन, पोलीस विभाग तसेच मसिआ संस्था, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर, जिल्हा उद्योग केंद्र, पर्यटन डेव्हलपमेंट फाउंडेशन, महाव्यवस्थापक महाऊर्जा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इ. विभागाने SWOT Analysis सह तयार केलेल्या जिल्हा विकास आराखड्याचे सादरीकरण बैठकीमध्ये केले. 

जिल्हा विकास आराखडा तयार करतांना प्रत्येक विभागाने आवश्यक आकडेवारीसह परिपूर्ण आराखडा तयार करावा, तसेच जिल्ह्याने तयार केलेला विकास आराखडा राज्य व देशाच्या विकासाला दिशादर्शक ठरेल असा तयार करावा. दूरगामी विकासाची दिशा निश्चित करणारा आराखडा सादर करावा. विशिष्ट नमुन्यात सर्व विभागाकडून माहिती एकत्रित संकलित करुन आव्हाने व उपाययोजनेच्या अनुषंगाने शाश्वत विकास साध्य होण्यास जिल्हा विकास आराखड्याची भूमिका महत्त्वाची ठरेल असे बैठकीत डॉ.गव्हाणे यांनी सांगितले.

जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठीचे तांत्रिक सल्लागार श्री. संजय देशमुख यांनी सर्व विभागास त्रुटी, आव्हाने व त्यावरील उपाययोजना सूचवून आराखडा परिपूर्ण करणारे सादरीकरण तयार कराण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक विकासात कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राचे महत्वाचे स्थान असल्याने यामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवून वातावरणीय बदलास अनुसरुन कमी धोके असलेला तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामध्ये शाश्वत विकास ध्येय (SDG), पाणी व्यवस्थापन, आरोग्य, शेती व व्यावसायिक शिक्षण यावर प्राधान्याने काम करण्याची आवश्यकता आहे असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.