महापालिकेच्या वतीने महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता प्रशिक्षण शिबीर संपन्न
पिंपरी चिंचवड,दि.29: महिलांचे जीवन मुलांच्या, पतीच्या तसेच नातेवाईकांच्या सेवेसाठी व्यतीत होत असल्याने त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास कमी वेळ मिळतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सोनल फाऊंडेशनच्या सोनल गांधी यांनी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सक्षमीकरण किंवा जागरूकतेसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांच्या आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने महिला जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कामगार कल्याण विभाग आणि सोनल फाऊंडेशनच्या वतीने आज चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षा उज्ज्वला गोडसे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, प्रशासन अधिकारी सविता आगरकर, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय एक्स रे विभागप्रमुख डॉ. रसिका वाघमारे, लघुलेखक विजयश्री देसाई, उपलेखापाल शुभांगी चव्हाण, पिंपरी चिंचवड सेवकांची पतसंस्था मर्यादित खजिनदार विजया कांबळे तसेच सुप्रिया सुरगुडे आदी उपस्थित होत्या.
महिला जागरूकता शिबीरात कर्मचारी महिलांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयक समस्यांचे निवारण, सध्याच्या मॉर्डन जीवनशैलीमुळे त्वचा व शरीरावर होणारे घातक दुष्परिणाम या विषयावर पुण्यातील आरोग्य सल्लागार सोनल राहुल गांधी आणि त्यांच्या सदस्यांच्या मार्फत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, कामगार कल्याण विभागाचे अधिकारी प्रमोद जगताप यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे मत माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे यांनी व्यक्त केले.

.jpg)