महापालिका शाळांमधील ४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मुल्यांकन..

0 झुंजार झेप न्युज

महापालिका शाळांमधील ४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मुल्यांकन..

पिंपरी चिंचवड,दि.07: महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे गुणवत्ता मुल्यांकन करण्यासाठी नेमलेल्या भारतीय गुणवत्ता परिषद संस्थेकडून विद्यार्थ्यांचे मुल्यांकन सुरू करण्यात आले असून आतापर्यंत २३ महापालिका शाळांमधील ४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण तसेच मुल्यांकन करण्यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, पर्यावरण अभ्यास या विषयांचा तसेच उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातंर्गत महापालिकेच्या ११० प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी महापालिका विविध उपक्रमांचे आयोजन करत असते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, विद्यार्थी आणि शिक्षकांचे मूल्यमापन महापालिकेच्या शाळांच्या शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात आहे. मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्याचा कल ओळखून त्यावर प्रभावीपणे काम करणे हा या मागचा हेतू आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला आणि शेवटी केल्या जाणाऱ्या मुल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये भर पडत असून भारतीय गुणवत्ता परिषदेच्या सहाय्याने निःसंशयपणे महापालिकेला प्रभावी शैक्षणिक धोरण आखण्यास मदत मिळेल.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, महापालिका शाळांच्या मुल्यांकनाद्वारे आलेल्या निकालांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेत सुधारणा करण्यासाठी योग्य कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले असून या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा कल ओळखण्यास आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यास शिक्षण विभागाला मदत होणार आहे.

सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांचे मुल्यांकन झाल्यानंतर सविस्तर अहवाल त्यांच्या पालकांना पाठविण्यात येणार आहे. याद्वारे पालकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी समजून घेता येईल तसेच शिक्षकांना विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करता येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.