• निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारदर्शक व निष्पक्ष
• निवडणूक प्रक्रिया राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर,दि.15: सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नेमून दिलेल्या मतदार संघात जबाबदारी पार पडावी व पारदर्शक व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आज औरंगाबाद १०८ पश्चिम मतदारसंघातील नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद १०८ पश्चिम मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस, शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डंभारे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रवीना यादव तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. कर्तव्य म्हणून मतदानाची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत वेगवेगळ्या उपक्रमातून जनजागृती करुन मतदानासाठी मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा यासाठी प्रयत्न व्हावे. मतदान केंद्रावर सर्व सुविधा मतदाराला उपलब्ध करून देण्यात याव्यात. मतदान केंद्रांवर वैद्यकीय सुविधा,शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी तसेच अन्य मतदारांसाठीही मतदार सहायता कक्ष स्थापन करण्यात यावा. महसूल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात औरंगाबाद पूर्व मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार मुनलोड यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
