लवकरच पिंपरी चिंचवड शहरात इझीपेडल राईडशेअर वाहतूक प्रकल्पाचा शुभारंभ
पिंपरी चिंचवड,दि.12: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने ईझीपेडल पब्लिक राईडशेअर या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना प्रगत युरोपीय तंत्रज्ञानावर आधारित पेडेलेक (इलेक्ट्रिक सायकल) आणि स्मार्ट सायकल राइडशेअर प्रणालीला लाभ घेता येणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर, वाकड आणि विशाल नगर या भागांचा समावेश केला जाईल. सायकलिंग संस्कृतीला चालना देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते. शहराच्या बस रॅपिड ट्रान्झिट (BRT) आणि मेट्रो यंत्रणेसाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत कार्यक्षम कनेक्टिव्हिटी मिळते. या उपक्रमामध्ये सार्वजनिक ठिकाणे, सामुदायिक जागा, निवासी क्षेत्रे आणि व्यावसायिक झोनमध्ये नियोजनपूर्वक सौर पॅनेलद्वारे चालणारे स्मार्ट डॉक स्थापित करण्यात येणार आहेत. शहरामध्ये सध्या पादचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांसोबत कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी मजबूत नेटवर्क तयार करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
पिंपरी चिंचवडमधील अभियंते निखील दिलीप देशमुख आणि प्रत्यूष श्रीनिवासन यांनी ईझीपेडल या स्टार्टअपची स्थापना केली आहे. युरोपियन मानके आणि जागतिक मॉडेल्सपासून प्रेरणा घेऊन त्यांनी नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम अशी राइडशेअर प्रणाली विकसित केली आहे. शहरामध्ये नवीन प्रकल्पांच्या विकसनासाठी कटीबद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरमध्ये या स्टार्टअपचे कामकाज चालते.
या प्रकल्पाची सुरुवात आणि अंमलबजावणी करण्यासाठी आर्किटेक्ट, नगररचनाकार आणि पिंपरी-चिंचवडचे बायसिकल मेयर आशिक जैन, महापालिकेचे अधिकारी, वाहतूक आणि परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, महापालिकेचे उपअभियंता सुनील पवार, सुश्री चित्रा पनवार, सीएस, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांचे सहकार्य लाभले.
मा. महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांनी पहिल्या टप्प्यात या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होईल असा आशावाद व्यक्त करून या उपक्रमासाठी पाठिंबा व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टीव्हीटी उपलब्ध होईल. शहरातील सायकल ट्रॅकचा वापर वाढेल. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेची नागरीककेंद्रित कामाकाजाप्रती असलेली वचनबद्धतादेखील प्रदर्शित होते. आपणा सर्वांना या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आणि यामध्ये सहभागी होण्याचे मी आवाहन करतो.”
या प्रकल्पामुळे नागरिकांना अनेक फायदे होणार आहेत. सायकलच्या वापरामुळे शरीराचा व्यायायाम होउन आरोग्यामध्ये सुधारणा होईल. कार्बन उत्सर्जन आणि वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे त्याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच स्वच्छ आणि हरित शहरासाठी प्रोत्साहन मिळेल. राइडशेअर प्रणालीच्या माध्यमातून कमी अंतरासाठी परवडणारा आणि सोयीस्कर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे बीआरटी आणि मेट्रो स्थानकांपर्यंत सहजपणे पोहोचता येते. एकूणच सार्वजनिक वाहतूकीची कार्यक्षमता सुधारते. या प्रकल्पामध्ये प्रगत युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ही सेवा फायदेशीर आहे. तसेच नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. या उपक्रमामुळे सायकलिंग आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर वाढणार आहे. शहरामध्ये मोटारविरहित प्रवासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे.
ईझीपेडल पब्लिक राइडशेअर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. शहराच्या विकासाला चालना देऊन नागरिकांना वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

.jpeg)