आदर्श आचारसंहिता लागू : चार विधानसभा मतदारसंघात १४ लक्ष मतदार बजावणार मतदानाचा हक्क - जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांची माहिती

0 झुंजार झेप न्युज

  • विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४
  • १५२३ मतदान केंद्रावर होणार मतदान
  • ७ लक्ष ३६ हजार पुरुष तर ६ लक्ष ६२ हजार स्त्री मतदारांचा समावेश
  • ३९ तृतीयपंथी मतदार करणार मतदान
  • २७१९ सैन्यातील जिल्ह्यातील मतदार

धाराशिव,दि.16: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने आज जाहिर केला आहे.हा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे.या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण १४ लक्ष २ हजार ३२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी आज १५ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव व संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.      

निवडणूकीच्या अनुषंगाने भरारी पथके तात्काळ गठीत करण्यात येत आहे,असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले की,विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर एक खिडकी योजनेतून उमेदवारांच्या प्रचरविषयक बाबींना मंजुरी व परवानगी देण्यात येणार आहे.मागील विधानसभा निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले.या निवडणुकीत ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.तसेच राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमांनी देखील सहकार्य करावे.असे आवाहन याप्रसंगी डॉ.ओंबासे यांनी केले.

निवडणूकीसाठी लागणाऱ्या आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन केले आहे असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले,मतदारांना २९ ऑक्टोबरपर्यंत मतदार म्हणून नावनोंदणी करता येईल.विविध अँपचा उपयोग निवडणूक यंत्रणांना आणि उमेदवारांना निवडणूकविषयक कामासाठी करता येणार आहे.जिल्ह्यात ६ क्रिटिकल मतदान केंद्र आहे.मतदारांना त्यांचे कोणत्या मतदान केंद्रावर मतदान आहे याची माहिती असलेली चिट्ठी (स्लिप) ही मतदानाच्या ३ ते ४ दिवस अगोदर मतदाराला देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. ओंबासे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात २८८ विधानसभा मतदान संघासाठी एकाच दिवशी म्हणजे बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असल्याचे सांगून डॉ. ओंबासे म्हणाले,जिल्हयातील २४० - उमरगा (अनुसूचित जाती राखीव), २४१-तुळजापूर,२४२-उस्मानाबाद आणि २४३ -परंडा या विधानसभा मतदारसंघात याच दिवशी मतदान होणार आहे.    

जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याचे सांगून डॉ ओंबासे म्हणाले, यामध्ये उमरगा -३२१,तुळजापूर -४१०, उस्मानाबाद-४१६ आणि परंडा -३७६ मतदान केंद्राचा समावेश आहे.   

 उमरगा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ६५ हजार ७७४ पुरुष,१ लक्ष ४८ हजार ९०६ स्त्री,९ तृतीयपंथी आणि भारतीय सैन्य दलात जिल्ह्यातील कार्यरत असलेले ६७४ मतदार असे एकूण ३ लक्ष १५ हजार ३३३ मतदार, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २ लक्ष ५५४ पुरुष, १ लक्ष ८१ हजार २९० स्त्री,७ तृतीयपंथी व भारतीय सैन्यतील ६१६ मतदार असे एकूण ३ लक्ष ८२ हजार ४६७ मतदार,उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ९५ हजार ८३८ पुरुष,१ लक्ष ७७ हजार ६३८ स्त्री,१७ तृतीयपंथी व भारतीय सैन्यातील असलेले ६३० मतदार असे एकूण ३ लक्ष ७४ हजार १२३ मतदार आणि परंडा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ७४ हजार ७६१ पुरुष,१ लक्ष ५४ हजार ८३६ स्त्री,६ तृतीयपंथी आणि ७९९ भारतीय सैन्यात असलेले जिल्हयातील मतदार असे एकूण ३ लक्ष ३० हजार ४०२ मतदार असे एकूण १४ लक्ष २ हजार ३२५ मतदार मतदानांचा हक्क बजावणार असल्याचे डॉ.ओंबासे यांनी सांगितले. 

डॉ. ओंबासे पुढे म्हणाले की,२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी जिल्हयातील /उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.यामध्ये ७ लक्ष ३६ हजार ८९७ पुरुष,६ लक्ष ६२ हजार ६७० स्त्री,३९ तृतीयपंथी आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जिल्हयातील २७१९ मतदार असे एकूण १४ लक्ष २ हजार ३२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.