पुरातत्व व संग्रहालये विभागाकडून तुळजाभवानी मंदिर आणि परिसराला मिळणार गतवैभव :-जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांची माहिती
धाराशिव,दि.29: श्री तुळजाभवानी मंदिरातील काही भागांचे जतन आणि संवर्धन पुरातत्व व संग्रहालये विभागाच्या मार्गदर्शनात करण्यात येणार असल्यामुळे मंदिर व परिसराला गतवैभव प्राप्त होणार असून मंदिर व परिसरात ५८ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी आज २८ नोव्हेंबर रोजी पुजारी मंडळ आणि नागरिकांच्या आढावा बैठकीत दिली.
यावेळी महंत तुकोजी बुवा,पाळीकरी पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपीन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष आनंदराव कोंडो,तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक माया माने,तहसीलदार अरविंद बोळंगे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले,अभियंता राजकुमार भोसले, प्रविण अमृतराव,जयसिंग पाटील व विश्वास कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे बांधकाम हे साधारण १२ शतकातील असून त्या अनुषंगाने मंदिर,मंदिर महाद्वार ते देवीच्या गाभार्यापर्यंत होणाऱ्या ५८ कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये मंदिर व परिसराचे जतन व संवर्धन ते कालबाह्य कामे काढून टाकणे हे एकूण सहा टप्प्यात होणार आहेत.
पुरातत्व व संग्रहालये संचालनालयाची या कामासाठी तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून एकूण सहा टप्प्यात ही कामे होणार आहेत.सवानी कंट्रक्शन मुंबई आणि साईप्रेम कंट्रक्शन लातूर यांना या दोन्ही एजन्सीं ही कामे करणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये यज्ञ मंडप,भुयारी मार्ग,सभा मंडप,भवानी मंदिर आणि भवानी मंडप यांचे जतन आणि दुरुस्ती दुसऱ्या टप्प्यांमध्ये मातंगी मंदिर,गोमुक्त तीर्थ,सिद्धिविनायक मंदिर,मार्तंड ऋषी मंदिर,टोळभैरव मंदिर व खंडोबा मंदिर यांच्यात मोठ्या प्रमाणात बदल न करता दुरुस्ती आणि जतन करणे,तिसऱ्या टप्प्यांमध्ये असंयुक्त बांधकामे काढणे यामध्ये स्टेडियम,पोलीस स्टेशन, जुने प्रशासकीय कार्यालय गार्डन याप्रमाणे असणारे असे कामे काढून टाकणे, चौथ्या टप्प्यामध्ये अभिषेक हॉल जतन आणि दुरुस्तीमध्ये तुकोजी महाराज यांच्या मठाचे क्षेत्र वाढविणे, अभिषेक हॉल विस्तारीत करून क्षेत्र वाढविणे,मंदिरातील ओहऱ्या काढून मंदिर एरिया वाढवणे,पाचव्या टप्प्यात तुकोजी महाराजांच्या मठापासून दोन लिफ्ट आणि महाद्वारातून एक लिफ्ट दिव्यांग व ज्येष्ठ भाविकांच्या सोयीसाठी करण्यात येणार आहे.
प्रत्येक टप्प्यामध्ये काम करत असताना पुजारी व भाविक यांना येणाऱ्या अडचणी व सूचना प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्यात असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी नागरिकांना केले.
यावेळी तिनही मंडळाचे पुजारी वर्ग तसेच मंदिर प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

