भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन शपथ..
पिंपरी चिंचवड,दि.19: देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधीत राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक कामकाज करण्याची शपथ आज महानगरपालिकेत घेण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
देशाच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांचा १९ नोव्हेंबर हा जन्मदिन दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांनी "आम्ही हिंसाचाराचा कधीही अवलंब करणार नाही.धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे तसेच राजकीय व आर्थिक गा-हाणी ही शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवू" अशी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

