20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सांय. 6 पर्यंत करता येणार मतदान
परभणी,दि.19: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील परभणी, गंगाखेड, जिंतूर व पाथरी या विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज रवाना झाले.
परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ठेवण्यात आलेले मतदान साहित्य परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सकाळीच कर्मचारी आले होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे हे यावेळी उपस्थित होते.

