चिंचवड मतदारसंघातून एक लाख मताने शंकर जगताप यांचा विजय
पिंपरी चिंचवड,दि.24: चिंचवडच्या आखाड्यात महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी दुरंगी लढत वाटत असली तरी, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर कुणाचा ताप वाढविणार, याविषयी चर्चा रंगली होती. मात्र अशातच आज मोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अखेर चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचेभाजपाचे उमेदवार शंकर जगताप हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचा पराभव केला आहे. जगताप यांच्या विजयानिमित्त थेरगाव परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे.
थेरगाव येथील स्व. शंकरराव गावडे कामगार भावनांमध्ये भावनांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा निकाल येण्यास सकाळी पावणेदहा वाजले. सुरुवातीला मतमोजणीचा वेग कमी होता. मात्र, नंतर तो वाढला. प्रत्येक फेरीला निकालाची उत्सुकता कायम होती. पावणेदोन पर्यंत २४ फेऱ्या पूर्ण झाल्या. पहिल्या फेरीपासूनच शंकर जगताप आघाडीवर होते तर दुसऱ्या क्रमांकावर राहुल कलाटे होते. अधिकृत आकडेवारी अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
जगताप यांची पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम होती. विजय घोडदौड सुरू असतानाच दीड वाजल्यापासून कार्यकर्त्यांची मतदान मोजणी केंद्रावर गर्दी होऊ लागले. कार्यकर्त्यांनी जय श्रीराम म्हणत जल्लोष केला.

