पिंपरीत भाजपतर्फे "महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर व पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा सत्कार
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडेय, विकास डोळस, माजी महापौर राहुल जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, कैलास सानप, कविता हिंगे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका तसेच कोअर कमिटीच्या सदस्य, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
*हा विजय कार्यकर्त्यांच्या घामाचा - शत्रुघ्न (बापू) काटे (शहराध्यक्ष)*
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले. ते म्हणाले, "शहराध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की, आमच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने हा गड सर केला आहे. आज महापौर, उपमहापौर पदी विराजमान झालेले नेतृत्व हे जमिनीवरचे नेतृत्व आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या योजना शहराच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हेच या पदाधिकाऱ्यांचे मुख्य लक्ष्य असेल. आगामी काळात पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाईल."
शहराचा सर्वांगीण कायापालट करणार- महापौर रवि लांडगे
सत्काराला उत्तर देताना महापौर रवि लांडगे भावूक झाले होते, ते म्हणाले, "महापौर पद ही केवळ सत्ता नसून ती जनतेने दिलेली जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवडमधील २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्पांना गती देणे हे माझे पहिले कर्तव्य असेल. अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आम्ही सरकारशी समन्वय साधू. शहराचा विकास करताना कोणताही राजकीय भेदभाव केला जाणार नाही."
महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणावर भर - उपमहापौर शर्मिलाताई बाबर
उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, "शहरातील प्रत्येक महिला स्वतःला सुरक्षित आणि स्वावलंबी समजली पाहिजे, हेच माझे ध्येय आहे. महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावणे आणि आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही विशेष योजना आखत आहोत."
पारदर्शक आणि गतिमान प्रशासन आमचे ध्येय
- प्रशांत शितोळे (सभागृह नेते)
प्रशांत शितोळे यांनी प्रशासकीय सुधारणांवर जोर दिला. ते म्हणाले, "सभागृहात जनतेच्या पैशांचा विनियोग योग्य कामांसाठीच होईल, याची मी खात्री देतो. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि फाईल्सचा जलद निपटारा ही आमची कामाची पद्धत असेल. प्रत्येक प्रभागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन 'टीम भाजप' म्हणून आम्ही काम करू."
प्रसंगी, राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सत्कारानंतर झालेल्या विशेष बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रम आणि विकासकामांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सोहळ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, शहराच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी तर सूत्रसंचालन वैशाली खाडये यांनी केले. आभार मधुकर बच्चे यांनी मानले.

.jpeg)