शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी -पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

0 झुंजार झेप न्युज

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक


वर्धा, दि.11 : खरीप हंगामाला सुरवात होत असून शेतकरी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. पिक कर्जासाठी बँक शाखेत अर्ज केल्यावर सदर अर्ज मुख्य शाखेत मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्ज प्रकरणे मंजूर होण्यास बराच वेळ जातो. परिणामी पेरणीला सुरवात होऊन जाते. यासाठी बँकांनी समन्वयाची भूमिका बजावून पिककर्जाची प्रकरणे तात्काळ मंजूर करावी. पिक कर्जाचे 100 टक्के वितरण करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्यात.
जिल्हास्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकीला खासदार अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. समिर कुणावार, आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर आदी उपस्थित होते.
मागील वर्षी 887 कोटी 48 लाख रुपयांचे पिककर्जाचे वाटप करण्यात आले. यावर्षी देण्यात आलेले पिककर्जाचे 100 टक्के लक्षांक पूर्ण होईल, असे बँकांनी नियोजन करावे. प्रधानमंत्री सौर कृषि पंप योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या सौरपंपामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने जिल्हा व तालुका तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा. पुर्वी गोपिनाथ मुंअंडे शेतकरी अपघात विमा योजनेत केवळ शेतकऱ्यांना मदत देण्यात येत होती. शासनाने यामध्ये बदल करुन शेतमजूरांचा समावेश केला आहे. याची ग्रामीण भागात कृषि विभागांनी जनजागृती करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत निधीपासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारण, जलयुक्त शिवारमधील कामांचे प्राधान्य ठरवून ती पूर्ण करण्यात यावीत. तसेच शेतक-यावर दुपारी पेरणीचे संकट येऊ नये यासाठी गावस्तरावर बैठका घेऊन शेतीचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशाही सुचना यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्यात.
यावर्षी जिल्ह्यात धान, ज्वारी, बाजरी, मका, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, तीळ, सुर्यफुल, भुईमुग, कापूस या पिकासाठी 4 लाख 18 हजार 975 हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून 87 हजार 184 क्विंटल बियाणे मागणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 1 लाख 17 हजार 100 मेट्रीक टन खताची मागणी असून एप्रिल अखेर पर्यंत 59 हजार 189 मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे, असे अरविंद उपरीकर यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी खासदार अमर काळे यांनी खत वितरीत करण्यासाठी वर्धा व हिंगणघाट रॅक पॉईट असल्याने काही तालुक्यात खत पुरवठ्याला विलंब होत असतो, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. आ. दादाराव केचे यांनी बोगस बियाणे विक्री करण्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे. पीएम किसान निधी पासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले तर आ. समिर कुणावार यांनी शेतक-यांना माती परीक्षण यावर मार्गदर्शन करण्यासाठी तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करावे, असे ते म्हणाले.
आ.राजेश बकाने यांनी एलनिनोच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनील जागृक राहून तसे नियोजन करण्याच्या सुचना दिल्यात. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी, कृषि निविष्ठा दुकानदार संघटनेची प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण शेती करणा-या शेतक-यांचा व शेतक-यांना सहकार्य करणा-या अधिका-यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.