सचिन काळभोर यांची आयुक्तांकडे मागणी; मंडप परवानगी शुल्कात एकसमान दर लागू करावेत!

0 झुंजार झेप न्युज

 🚨 सचिन काळभोर यांची आयुक्तांकडे मागणी; मंडप परवानगी शुल्कात एकसमान दर लागू करावेत!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी | दि.10: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध प्रभागांमध्ये मंडप परवानगी शुल्काच्या आकारणीत मोठी तफावत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

सचिन काळभोर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, 'अ' क्षेत्रीय कार्यालयामार्फत मंडप परवानगीसाठी प्रति चौरस फूट १० रुपये दर आकारला जात आहे, तर दुसरीकडे 'फ' क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याच परवानगीसाठी प्रति चौरस फूट ५० रुपये दर आकारला जात आहे. एकाच महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळे दर लागू असल्याने नागरिक, संस्था, मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक संस्था, मंडळे, व्यापारी संघटना आणि सेवाभावी कार्यकर्त्यांकडून वारकरी बांधवांसाठी मोफत अन्नदान, वैद्यकीय सेवा, औषध वाटप, चहा-नाश्ता, रेनकोट व छत्री वाटप यांसारखे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. मात्र मंडप परवानगीसाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कामुळे या सेवाभावी उपक्रमांवर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व आठ प्रभागांसाठी मंडप परवानगी शुल्काचा एकसमान दर निश्चित करण्यात यावा, अवाढव्य शुल्क आकारणी रद्द करून वाजवी व सुधारित दर लागू करावेत आणि पालखी सोहळ्याच्या काळात सामाजिक व धार्मिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या तक्रारीची दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन नागरिकांवरील आर्थिक भार कमी करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.