शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा' – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0 झुंजार झेप न्युज

 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत धरणगाव येथे भव्य समाधान शिबिर; २ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

जळगाव, दि.25 : "सामान्य नागरिकांना महसूल सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच प्रशासनाच्या कार्याचे खरे यश आहे. प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत शासनाच्या सेवा वेळेत पोहोचल्या पाहिजेत. शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वरी सेवा आहे," असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ते धरणगाव येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान' अंतर्गत भव्य समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, एरंडोल उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, शीतल राजपूत, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सागर कोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रमोद पांढरे, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, अजित तडवी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, संदीप मोरे, श्री. वाघ, उबाठाचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, सचिन पवार, रवींद्र चव्हाण, मोतीआप्पा पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, बचत गटांच्या महिला,माजी सभापती पी.सी. आबा पाटील, जि प.चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील , भानुदास विसावे, नगरसेवक, सरपंच, विविध विभागांचे अधिकारी - कर्मचारी, पदाधिकारी तसेच जळगाव व धरणगाव तालुक्यातील हजारो लाभार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, "एका छताखाली दोन हजारांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविणारे हे शिबिर म्हणजे लोकाभिमुख प्रशासनाचे जिवंत उदाहरण आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून 'महा राजस्व अभियान' यशाचा नवा टप्पा गाठत आहे. प्रारंभी पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या जनहितकारी कार्याचे स्मरण करून प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने संवेदनशीलता, उत्तरदायित्व आणि सेवाभाव जपत नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्येक पात्र लाभार्थ्याने शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत सहभागी होऊन मतदार यादीतील नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करत भविष्यात चारा टंचाई टाळण्यासाठी शिबिरात चारा पिकांच्या बियाण्यांचेही वितरण करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिबिरात 2 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभाचे वाटप

या महाशिबिरात महसूल,1542 कृषी 21आरोग्य 1365 पंचायत समिती 1291 महिला व बालविकास 204, शिक्षण 50 नगर परिषद44 वन,सामाजिक वनीकरण 38 महावितरण 63 तसेच नोंदणी व मुद्रांक 22 अशा एकूण 4754विभागांच्या विविध योजनांचा लाभ अधिक लाभार्थ्यांना देण्यात आला. यामध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना, विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके व गणवेश, कृषी अवजारे, ट्रॅक्टर, बेबी केअर किट, मातृ धरण गाव तालुक्यातील 55 बचत गटांना 3 कोटी 67 लाख तर जळगाव तालुक्यातील 86 गटांना 5 कोटी 52 लाख बँक कर्ज व समुदाय गुंतवणूक निधीचे वाटपसह सेवांचा लाभ लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आला.
प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी प्रास्ताविकातून 'छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान' या उपक्रमाची उद्दिष्टे, शासनाचा हेतू आणि नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध महसूल सेवांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले, तर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.