रेशीम शेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार – डॉ. अशोक जाधव

0 झुंजार झेप न्युज

 रेशीम शेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार – डॉ. अशोक जाधव

सिल्क समग्र-२ अंतर्गत २५ लाभार्थ्यांचे निवासी प्रशिक्षण सुरू

नांदेड,दि. 22 : कमी पाणी आणि खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता रेशीम शेतीत आहे. शास्त्रीय पद्धतीने रेशीम शेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे प्रतिपादन REC परभणीचे वैज्ञानिक डॉ. अशोक जाधव यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयांतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड यांच्यावतीने सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत आयोजित सात दिवसीय लाभार्थी सक्षमीकरण निवासी प्रशिक्षणाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते SBI RSETI, नांदेड येथे करण्यात आले. दि. २० ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे विभागप्रमुख डॉ. देविकांत देशमुख, जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात रेशीम शेतीचा विस्तार वाढत आहे. कमी पाणी, कमी खर्च आणि तुलनेने कमी कालावधीत उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन रेशीम उत्पादन वाढविण्यास उपयुक्त ठरेल, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
या प्रशिक्षणात तुती लागवड व बाग व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपन, रोग व्यवस्थापन, कोष उत्पादन, बाजारपेठ व्यवस्था आणि शासकीय योजनांची माहिती तज्ज्ञांकडून दिली जात आहे. प्रात्यक्षिकांद्वारे दिले जाणारे प्रशिक्षण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत उपयोगी ठरेल. प्रशिक्षणानंतरही लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी सांगितले.
रेशीम शेतीमध्ये तुतीच्या पानांवर रेशीम कीटकांचे संगोपन करून रेशीम कोषांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने तुती रेशीम उत्पादन केले जाते. एकदा लागवड केलेली तुती बाग १५ ते २० वर्षे उत्पादन देऊ शकते. वर्षातून पाच ते सहा वेळा कीटक संगोपन करता येत असल्याने उत्पन्नाचे नियमित साधन उपलब्ध होते. तुती लागवड, कीटक संगोपन गृह, साहित्य व उपकरणांसाठी शासनाकडून अनुदान तसेच प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन वडवळे यांनी केले.
प्रशिक्षणाचा समारोप २६ नोव्हेंबर रोजी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी प्रशिक्षक शिवप्रसाद माळवतकर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कांचन जाधव, क्षेत्र सहाय्यक अमर सूर्यवंशी, खिल्लारे, कोल्हे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.