'पवारांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील' — संजय राउत

0 झुंजार झेप न्युज

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत अनपेक्षित गुगली टाकल्याने शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल आणि शिवसेनाच सरकारचे नेतृत्व करेल, असा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. तसेच शरद पवार यांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
भाजपने त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपच्या अंताची सुरुवात ही महाराष्ट्रातून होणार आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे.विधानसभेत आम्ही १७० चं बहुमत सिद्ध करु, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे.
शरद पवार मोठे नेते आहेत. शरद पवार काहीही चुकीचे बोलले नाहीत. पवारांना त्यांच्या आघाडीतील नेत्यांशी चर्चा करावीच लागेल. त्याला आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही. सत्तास्थापनेचा गोंधळ फक्त मीडियाच्या मनात आहे. सत्तास्थापनेसाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी पाच महिने लागले होते, २०१४ मध्ये १५ दिवस लागले होते, असेही राऊत यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरलेला नव्हता. अफवा पसरवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.