संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला असून, या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील वारक-यांवर आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवे घाटात काळाने घाला घातला. जेसीबीचा ब्रेक फेल झाल्याने हा जेसीबी थेट वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसला. या अपघातात दोन वारक-याचा चिरडून मृत्यू झाला तर एक वारकरी अत्यवस्थ असून १७ वारकरी जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज हभप सोपान महाराज तुळशीदास नामदास ( वय ३६ वर्षे, रा. पंढरपूर) तसेच हभप अतुल महाराज आळशी (वय -२४ वर्षे, रा.खेड) यांचा समावेश आहे.
