प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपात अंतर्गत संघर्ष टोकाला सक्रिय कार्यकर्ता सचिन काळभोरांना उमेदवारी नकोच? आमदार महेश लांडगेंच्या भूमिकेमुळे संभ्रम

0 झुंजार झेप न्युज

प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपात अंतर्गत संघर्ष टोकाला सक्रिय कार्यकर्ता सचिन काळभोरांना उमेदवारी नकोच? आमदार महेश लांडगेंच्या भूमिकेमुळे संभ्रम

पिंपरी-चिंचवड, दि.27: भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ (निगडी गावठाण) येथे भारतीय जनता पार्टीत अंतर्गत राजकारण तापले असून, संभाव्य उमेदवारीवरून पक्षात उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपचे जुने व आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सचिन काळभोर यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी खुद्द आमदार महेश लांडगे यांनी ठाम भूमिका घेतल्याने शहराच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

भाजप शहर कोअर कमिटीमध्ये प्रभाग क्रमांक १३ साठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असताना, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. प्राथमिक चाचपणी करून काही इच्छुकांचे अर्जही दाखल करून घेण्यात आले. मात्र, ऐनवेळी आमदार महेश लांडगे यांनी सचिन काळभोर यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध करत भूमिका घेतल्याने संपूर्ण प्रक्रियेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सचिन काळभोर हे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचे सक्रिय आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, पाणीपुरवठा, कचरा, वाहतूक, महापालिकेतील गैरकारभार अशा विविध नागरी समस्यांवर त्यांनी थेट रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलनं केली. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हेही दाखल झाले आहेत. तरीही शहरातील बहुतांश नागरी प्रश्नांमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.

असे असतानाही आमदार महेश लांडगे यांनी सचिन काळभोर यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी पुढाकार घेतल्याने पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. लांडगे आणि काळभोर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वाद सुरू असून, त्याचे पडसाद आता थेट उमेदवारी प्रक्रियेवर उमटताना दिसत आहेत. दोघेही भाजपमध्येच काम करत असले तरी एकमेकांविरोधात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

यापूर्वी भाजप शहर कार्यकारिणीच्या नियुक्तीवेळीही आमदार महेश लांडगे यांनी सचिन काळभोर यांची नियुक्ती ऐनवेळी थांबवत त्यांना पदापासून दूर ठेवले होते. तेव्हापासून काळभोर यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात आंदोलनांची धार वाढवली. तर दुसरीकडे, आमदार लांडगे आणि काळभोर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत गेला.

आता निवडणुकीच्या तोंडावरच सचिन काळभोर यांना ‘बाहेरचा रस्ता’ दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. आमदार महेश लांडगे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणारे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवून भोसरी मतदारसंघात एकही प्रबळ राजकीय विरोधक शिल्लक ठेवलेला नाही. जो कोणी विरोधात उभा राहिला, त्याची राजकीय कारकीर्द संपवून लांडगे यांनी आपले पाळेमुळे अधिक मजबूत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या पार्श्वभूमीवर सचिन काळभोर यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यास, तो भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणता संदेश जाईल, याबाबतही चर्चा रंगली आहे. मात्र, सर्व वादांनंतरही सचिन काळभोर यांनी पक्षनिष्ठेची भूमिका जपली आहे.

“भाजप हा माझा पक्ष आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी मी मनापासून काम करेन,” असे त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १३ मधील ही अंतर्गत धुसफूस भाजपसाठी डोकेदुखी ठरणार की नेतृत्वाचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून येणार, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.