प्रभाग १३ मध्ये आयात उमेदवारीवर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा उद्रेक; निष्ठावानांना डावलल्याचा आरोप

0 झुंजार झेप न्युज

प्रभाग १३ मध्ये आयात उमेदवारीवर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा उद्रेक; निष्ठावानांना डावलल्याचा आरोप

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी परिसरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आयात उमेदवारी जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अनेक वर्षांपासून शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी नाकारली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच वेळी, पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या उमेदवारांना तात्काळ तिकीट दिले जात असल्याने नाराजी अधिक तीव्र झाली आहे.

भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे आपली भूमिका स्पष्ट करत तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षवाढीच्या नावाखाली जुन्या कार्यकर्त्यांच्या त्याग, संघर्ष व निष्ठेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शहर अध्यक्ष, आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जात नाही, संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

सामान्य कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आंदोलने, मोर्चे काढत गुन्हे अंगावर घेतले; मात्र निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासनांच्या माध्यमातून त्यांना गप्प बसवले जाते, असा गंभीर आरोप काळभोर यांनी केला. आर्थिक तडजोडीच्या आधारे उमेदवारी जाहीर केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, कोणतीही वैयक्तिक खंत न बाळगता, आगामी निवडणुकीत निगडीतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपचे चारही नगरसेवक प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण व सहकारी कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचा निर्धार सचिन काळभोर यांनी व्यक्त केला. मात्र भविष्यात “पक्ष संघटना” या नावाखाली कार्यकर्त्यांचा केवळ वापर होऊ नये, अशी कळकळीची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.