पुणे : ज्ञानेश्वर माउलींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला असून, या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील वारक-यांवर आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवे घाटात काळाने घाला घातला. जेसीबीचा ब्रेक फेल झाल्याने हा जेसीबी थेट वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसला. या अपघातात दोन वारक-याचा चिरडून मृत्यू झाला तर एक वारकरी अत्यवस्थ असून १७ वारकरी जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज हभप सोपान महाराज तुळशीदास नामदास ( वय ३६ वर्षे, रा. पंढरपूर) तसेच हभप अतुल महाराज आळशी (वय -२४ वर्षे, रा.खेड) यांचा समावेश आहे.
कार्तिक वद्य अष्टमीला हा सोहळा आळंदीमध्ये पोहोचून कार्तिक वद्य त्रयोदशी दिवशी हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो. यासाठी अनेक वर्षांपासून केशवराज संस्थानच्या वतीने संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे, तर गेल्या ८ वर्षांपासून विठ्ठल - रुक्मिणीमंदिर समिती आणि हभप विठ्ठल तात्यासो वासकर यांच्या वतीने श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्तिकी त्रयोदशीला माऊलींनी संजीवन समाधी घेतली, त्याही वेळेस साक्षात पांडुरंग उपस्थित होते, अशी आख्यायिका आहे. सासवडच्या पालखी तळावरून मंगळवारी ( दि १९ ) पहाटे ३ वाजता श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे तर संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन संधी मंदिरातून पहाटे ६ वाजता संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आळंदीकडे मार्गस्थ झाला. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा सोहळा दिवे घाटातील अंतिम टप्प्यातील वळणावर असताना जेसीबी ( सी ६- ०४ - डी एम ६५०५ ) चा ब्रेक फेल झाल्याने तो दिंडीत घुसल्याने या जेसीबीने वारक-यांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला, तर १७ वारकरी जखमी झाले आहेत. या दिंडीत दोन हजारांहून अधिक वारक-यांचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीप्रमाणे जखमींची नावे पुढीलप्रमाणे :-
ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम, विष्णू सोपान हळवाल, शुभम नंदकिशोर आवरे, दीपक अशोक लासुरे, नामदेव सागर, सोपान महासाळकर, गजानन सुरेश मानकर, सोपान मासळीकर, गजानन संतोष मानकर, वैभव लक्ष्मण बराटे, अभय अमृत मोकम्फळे, किर्तीमन प्रकाश गिरजे, आकाश माणिकराव भाटे, गरोबा जागडे, विनोद लहासे अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती रामभाऊ चोपदार यांनी दिली आहे. भोरच्या कारभारी दिंडी ( क्रं १९ ) तसेच जोग महाराज दिंडीतील काही वारकरी या अपघातात जखमी झाल्याचे समजते. लोणी काळभोर ( ता. हवेली ) पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर दिंडीतील संतप्त वारक-यांनी जेसीबीची तोडफोड केली. संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा लाखो वारक-यांसह आषाढी वारीसाठी याच अवघड दिवे घाटाची चढण चालून पंढरीकडे जातो. मात्र अशी घटना या सोहळ्यात कधीही झाली नव्हती. मात्र आजच्या या घटनेमुळे वारकर्यांमध्ये दु:खाचे सावट पसरले आहे.
अपघातात मृत्युमुखी आणि जखमी झालेल्याची नावे :


