श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे हंगा नदीजवळील एका विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला.
मीना गणेश आढाव (वय ३२, रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा), अनुजा गणेश आढाव (वय ६) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. दरम्यान हा घातपात असावा असा संशय विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गणेश परशुराम आढाव हे वडील, पत्नी, मुलगीसह कोरेगव्हाण येथे राहत होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नी व मुलगी घरातून बाहेर पडल्या असे पती गणेश आढाव यांनी सांगितले
सोमवारी सकाळी ग्रामस्थ, विवाहितेच्या नातेवाईकांनी कोरेगव्हाण येथे शोध घेतला. गणेश आढाव याच्या घराच्या मागे हंगा नदी तिरा जवळ विहिरीजवळ विवाहितेच्या चप्पला आढळून आल्या.
त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता विवाहिता व मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

