पालघर जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर करण्यार आला आहे. ज्यात महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. पालघरसोबतच नंदुरबार, नागपूर, वाशिम याठिकाणीही महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. दरम्यान, राज्यात आज (ता. ८ ) सहा जिल्हा परिषदेचा निकाल समोर आला आहे. यामध्ये पालघर जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.
पालघरमध्ये आज जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुक झाली होती. ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या ५७ तर आठ पंचायत समित्यांच्या ११४ जागांसाठी झाली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं आहे.
या निवडणुकीत शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १५ , भाजप १०, कॉंग्रेसला १ तर इतर पक्षांना १३ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान शिवसेनेला सत्ता राखण्यासाठी २९ जागांची गरज असली तरी दुसऱ्या कोणत्याही पक्षालादेखील स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे.

