बीड प्रतिनिधी :
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीकडून शिवकन्या शिरसाट तर उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांची नावे निश्चित झाली आहेत. राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी शिवकन्या शिरसाट तर उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर भाजपकडून जि.प.च्या अध्यक्षपदासाठी डॉ. योगिनी थोरात तर उपाध्यक्षपदासाठी भरत काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच पुर्वी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे हे गटनेते होते. आता त्यांच्या जागी अजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच आता गरज भासली तरच मतदान होणार असून नसता निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता आहे.
बीड जिल्हा परीषदेतील बहुमताचा आकडा राष्ट्रवादी काँग्रेसने पार केला आहे. भाजपच्या सविता मस्के, शोभा संजय नवले, शोभा दरेकर, निता सतिश शिंदे, शिवसेनेचे चार आणि काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख, आशा संजय दौंड आणि राष्ट्रवादीचे स्वतःचे 21 असे मिळून 31 संख्याबळ झाले आहे. राष्ट्रवादीच्या आपसात ठरलेल्या फॉर्म्यूल्यानुसार अध्यक्षपद धनंजय मुंडे गटाला तर उपाध्यक्षपद बजरंग सोनवणे यांना देण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार धनंजय मुंडे गटाकडून शिवकन्या सिरसाट आणि बजरंग सोनवणे यांची नावे अंतिम झाली आहेत.
प्रकाश सोळंके गटाला दोन, काँग्रेसला एक असे सभापतीपद देण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार सोळंके गटाकडून जयसिंह सोळंके आणि अनुसया रामप्रभू साळुंके यांची नावे आघाडीवर होती. बीड जिल्हा परिषदेत बहुमत मिळवण्यासाठी 27 हा जादुई आकडा आहे. धनंजय मुंडे गटाकडे दोन दिवसापुर्वी केवळ 23 सदस्यांचं संख्याबळ होतं. मात्र दोन दिवसात धनंजय मुंडे यांनी जादुची कांडी फिरवत संख्याबळ 31 केले आहे.
आज जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड होत असली तरी 13 जानेवारीपर्यंत ही निवड जाहीर न करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत. आ.सुरेश धस गटाचे 4 व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाच्या एका सदस्याला यापुर्वी पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र करण्यात आलेले होते. या पाचही सदस्यांनी खंडपीठात धाव घेऊन मतदानाचा अधिकार देण्याची याचिका दाखल केली होती. याचिकेवर 13 जानेवारी रोजी अंतिम निर्णय होणार आहे.

