मीच रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष : दिपक निकाळजे

0 झुंजार झेप न्युज

नाशिक : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षाचा रामदास आठवले यांनी २०१८ मध्ये राजीनामा दिला असून, आता या पक्षात माझी २७ राज्यांच्या अध्यक्षांनी नोव्हेंबरमध्ये निवड केल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे  दीपक निकाळजे यांनी दिली. आता या पक्षाची वाढ करण्यासाठी देशभर दौरे करणार असून, पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर आमचा भर असल्याचे निकाळजे यांनी सांगितले.
जिल्हा दौऱ्यावर असलेले निकाळजे यांचा नियोजित देवळा दौरा होता. मात्र, बसचा भीषण अपघात झाल्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला. रामदास आठवले यांच्या मर्जीतील कार्यकर्ते असलेले निकाळजे पक्षाचे उपाध्यक्ष होते; पण नोव्हेंबरमध्येच त्यांची पक्षाने पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केली होती. या सर्व मुद्द्यांवर निकाळजे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षाची २७ जुलै १९९० रोजी स्थापना झाली. २००९ ते २०१८ पर्यंत रामदास आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मात्र, २०१८ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर १० नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत २७ राज्यांच्या अध्यक्षांनी माझी निवड केली. या वेळी त्यांना आठवलेंचा पक्ष कोणता, हा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, की कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव सारखे नसते. २०१४ च्या जीआरप्रमाणे समान नावाचे पक्षांची नोंद होत नाही. असे असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) अशा नावाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नोंदणी केली. सत्तेच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. त्यामुळे त्यांची ही मान्यता रद्द करण्यात यावी, यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. त्यांनी कार्यवाही न केल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे निकाळजे यांनी सांगितले. या वेळी ते म्हणाले, की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधील 'ए' हा शब्द आंबेडकरांचा आहे; आठवलेंचा नाही.
सर्व गट एकत्र करणार
रिपब्लिकन पक्ष कोणत्याही एका जातीचा नाही; पण तो आतापर्यंत एका जातीपुरता करण्यात आला. त्यामुळे पक्षाची वाढ झाली नाही. त्यामुळे आता तरुणांना घेऊन आम्ही पक्षाची वाढ करणार आहोत. त्यासाठी राज्यात दौरे करीत आहोत. पालघरनंतर आम्ही नाशिक जिल्हा दौरा केला. आता वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाणार आहोत. या दौऱ्यात रिपब्लिकन पक्षाबाबत झालेला कार्यकर्त्यांचा संभ्रमही आम्ही दूर करीत आहोत. पक्षाच्या माध्यमातून आम्ही रोजगारावर भर देणार आहोत. रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या गटांशी चर्चा करू, असेही निकाळजे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.