'पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांनी घेतली अजितदादांची धास्ती' | झुंजार झेप न्यूज

0 झुंजार झेप न्युज


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
पिंपरी : २०१४ रोजी राज्यात सत्ता गेल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेत सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड हातात ठेवण्याच्या अजित पवारांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल होत. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये आपले लक्ष घातले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय अधिकारी कामाला लागले असून महत्त्वाच्या फायली अपडेट करण्यावर अधिकारी भर देत असल्याचे पहावयास मिळत आहे. यातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचे पिंपरी चिंचवड महापालिकेवर विशेष लक्ष असल्याने अधिकाऱ्यांनी याची धास्ती घेतली आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारात पिंपरी-चिंचवड शहराचे अनेक वर्ष कारभारी असलेले अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या बदलाचे परिणाम महापालिकेत जाणवू लागले आहेत. महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनामध्ये मरगळ आली आहे. सोमवारपासून महापालिकेचे कामकाज थंडावल्याचे दिसून येत आहे. स्थायी समितीची कालची साप्ताहिक सभा तहकूब करण्यात आली. सभा संपल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांची तब्बल तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची माहिती, फाइल अपडेट कराव्यात, असे आदेशच आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे.
नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाणी प्रश्नावरून चांगलेच फैलावर घेतले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या कार्यशैलीला सामोरे जाताना आपल्या विभागाची माहिती, फाइल अपडेट करण्यासाठी अधिकारी जिवाचे रान करीत आहेत. यासाठी साइट व्हिजीट सुरू आहे प्रशासकीय भवनात न बसता क्षेत्रीय कार्यालयात बसून कामाचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील सत्ता गेल्याने सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी देखील महापालिकेतील जास्त फिरकत नाहीत. त्यांचा राबता कमी झाला आहे. भाजपचे नगरसेवकही कमी प्रमाणात फिरकू लागले आहेत. तर, दुसरीकडे महापालिकेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचा माहोल आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची महापालिकेतील वर्दळ वाढली आहे. राष्ट्रवादीतील घडामोडी वाढल्या आहेत. तर, सत्ताधारी भाजपच्या गोटात शांतता असून घडामोडी थंडावल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.