नवी दिल्ली : दिल्लीच्या रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आज सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची तयारी रामलीला मैदानावर सुरू आहे. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.
रामलीला मैदानात त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्रीही शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण दिल्लीला आमंत्रण देण्यात आलंय. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, बाईक ऍम्बुलन्स रायडर्स, सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्सल, ऑटो ड्रायव्हर यांचा समावेशही आहे.
केजरीवालांच्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी दिल्ली पोलीस, सीआरपीएफसह निमलष्करी दलातील 2,000 ते 3,000 जवान तैनात असतील.
दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी रविवारी रामलीला मैदानावर तब्बल एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असा दावा आपकडून करण्यात आला आहे. "सुमारे एक लाख लोक या सोहळ्याला पोहोचण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिक गेट क्रमांक 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या सहा प्रवेशद्वारातून रामलीला मैदानात प्रवेश करु शकतील", असं त्यांनी सांगितलं.

