हिंगणघाट : मला गोळी घालून मारा,आरोपीची मागणी

0 झुंजार झेप न्युज

एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केलेल्या हिंगणघाट येथील तरुणीची मृत्युशी निकराची झुंज अपयशी ठरली. सोमवारी (१० फेब्रवारी) पहाटे तिचा मृत्यू झाला आणि वर्ध्यासह अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. या तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पीडितेला त्वरीत न्याय मिळावा आणि आरोपी विकेश नगराळे याला लवकरात लवकर फासावर लटकवण्यात यावे अशी मागणी या मुलीच्या मृत्यूनंतर होताना दिसत आहे. राज्य सरकारने देखील हा खटला जलद गतीने चालवण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये आता आरोपी विकेश नगराळेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पीडितेचा मृत्यू झाल्याचे आरोपी विक्कीला ठाऊक नव्हते.
मात्र यासंदर्भात त्याला माहिती देण्यात आल्यानंतर त्याने एक मागणी केली आहे. पीडितेचा मृत्यू झाल्याचे विक्की नगराळेला सांगण्यात आल्यानंतर त्याने "माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याने मला गोळ्या झाडून मारुन टाका," अशी मागणी केली आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यातील जनतेने व्यक्त केलेला संताप आणि लोकभावनेच्या दबावामधून आरोपीने अशी मागणी केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
जेव्हा बातमी समजली.
सोमवारी पीडितेचा मृत्यू झाला त्या दिवशी याबद्दलची कोणतीच माहिती विक्कीला नव्हती. पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी आरोपीला देण्यात आली. त्यानंतर तो बराच काळ आरोपी काहीच न बोलता एकाच जागी उभा होता. नंतर तो आपल्या बॅरेकमध्ये पलंगावर बराच वेळ बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताच भाव दिसून येत नव्हता. दैनंदिन झडतीदरम्यान आरोपीने "माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय तर मला गोळी झाडून मारुन टाका," अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.
नक्की काय घडलं हिंगणघाटमध्ये?
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता ३ फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.
कोण आहे आरोपी?
आरोपीचे नाव विकेश नगराळे असं आहे. आरोपीचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते.
बॅरेकमधील कैद्यांची संख्या कमी करण्यात आली
हा प्रकार घडल्यानंतर अवघ्या सहा तासांमध्ये आरोपी विक्कीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला वर्ध्यातील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. कारागृहामधील बॅरेक क्रमांक पाचमध्ये त्याला ठेवण्यात आलं असून त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुरुंग प्रशासनाने त्याच्या बॅरेकमधील काही कैद्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलं आहे. विक्कीला अटक करुन तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्याच्याबरोबर बॅरेकमध्ये १२ ते १५ कैदी होते. मात्र त्यानंतर या बॅरेकमध्ये केवळ पाच कैदी ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणावरुन राज्यभरात होत असलेला संताप पाहता सुरक्षेच्या दृष्टीने विक्कीच्या बॅरेकमधील कैद्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.
ओळख परेड झाली
विक्कीला चार दिवस पोलीस कोठडीमध्ये तर चार दिवस वर्धा कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर २० फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नायब तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये कारागृहातच या प्रकरणातील पाच साक्षीदारांची ओळख परेडही करण्यात आली. यावेळी दोन सरकारी पंचही उपस्थित होते. एक तास चाललेल्या या परडेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोपीला नागपूरमधील कारागृहात हलवण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.