पुणे : भांडारकर रोडवरील एका घरात लागलेल्या आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. संदीप विनायक गोखले (वय ४६, रा. राजेश्री, गल्ली क्रमांक ६, भांडारकर रोड) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांडारकर रोडवरील गल्ली क्रमांक ६ मध्ये सोसायटीच्या आऊटहाऊसमध्ये पहाटे २ वाजून ५३ मिनिटांनी आग लागल्याची अग्निशमन दलाला वर्दी मिळाली. एरंडवणा येथील गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. सुमारे ३०० चौरस फुटाच्या या जागेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. एरंडवणा आणि कसबा फायरच्या जवान व देवदूत यांच्या कर्मचार्यांनी काही वेळातच ही आग विझवली.
आतील सर्व पुस्तके व इतर साहित्य जळून खाक झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आत जाऊन पाहिले असताना तेथे एक तरुण निपचित पडलेला आढळून आला. या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

