ब्रिटनच्या आरोग्यमंत्री नदीन डॉरिस यांनाही करोनाची लागण

झुंजार झेप न्युज

लंडन: जगभरात कोरोनामुळे तब्बल साडे तीन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून जवळपास शंभर देशांमध्ये कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरातले देश कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना करत आहेत. सर्वच देशांमधील सरकारं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पावलं उचलत असताना ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटिश खासदार आणि आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांनी मंगळवारी एक पत्रक जारी करुन कोरोनाची बाध झाल्याची माहिती दिली.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी घरात कुटुंबातल्या इतर सदस्यांपासून दूर राहत आहे, अशी माहिती डॉरीस यांनी निवेदनातून दिली. डॉरीस यांना कोरोनाची बाधा नेमकी कुठे आणि कशी झाली, याचा शोध आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे.

नदीन डॉरीस या कोरोनाची लागण झालेल्या ब्रिटनमधल्या पहिल्या राजकीय नेत्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी डॉरीस यांना गेल्या काही दिवसांत अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून इतरांनाही कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांमध्ये डॉरीस यांनी शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचाही समावेश आहे.

नदीन शुक्रवारी आजारी पडल्या. त्याच दिवशी त्यांनी कोरोनाला विमा संरक्षण देण्यासंदर्भात कायदा करण्याचा निर्णय घेतला. नदीन यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांनी योग्य सल्ला आणि सहकार्य दिल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६ जणांनी जीव गमावला आहे.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.