मांडवगण फराटा- शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील इनामगाव, तांदळी, मांडवगण फराटा, पिंपळसुट्टी येथे हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या हॉटेलमध्ये अवैधरीत्या दारूविक्री होत आहे. दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे, पण पोलिसांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
उजनी धरणातील मासे खवय्यांना खाण्यासाठी मिळत आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागांतील रस्त्याच्याकडेला विनापरवाना हॉटेल व्यवसाय उभे राहिले. या हॉटेलमधून अवैध दारूची विक्री होत आहे. परिणामी मद्यपी अनेकदा मुख्य रस्त्यावरच पडलेले दिसतात. नागरिक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे पहावयास मिळत आहे.
नागरगाव, रांजणगाव सांडस, आंधळगाव, कुरूळी, वडगाव रासाई, गणेगाव दुमाला, रांजणगाव सांडस या गावांमध्ये गावठी दारू गावातील मुख्य चौकात विकली जात आहे. 26 जानेवारी 2019 ला शिरूर तालुक्यात दारुबंदी होण्यासाठी ग्रामसभेत ग्रामपंचायतींकडून ठराव घेण्यात आले होते. त्या ठरावांना केराची टोपली दाखवल्याचे यावरून दिसून येते. जुगार व मटका अशा अवैध धंद्यांवर काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाने कारवाई केली असली तरीही हे व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच हॉटेल परिसरात मद्यपी दारू पिऊन झाल्यानंतर दारूच्या त्याच ठिकाणी टाकत असल्याने बाटल्यांचा ढीग साचला आहे.
- अवैध दारूबंदीची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क खात्याची आहे. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्यास ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व बीट हवालदार यांनी संबंधितांना याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे.
-संजय पाचंगे, अध्यक्ष क्रांतिवीर प्रतिष्ठान
शिरूरच्या पूर्व भागात अवैध धंदे सुरू असतील तर त्याबाबत नागरिकांनी माहिती द्यावी. माहिती मिळताच अवैध धंद्यांवर कारवाई केली जाईल.
-बिरदेव काबुगडे, सहायक पोलीस निरीक्षक, शिरूर - अवैध धंदे करणाऱ्या हॉटेल चालकांची नावे राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांनी कळविल्यास संबधितावर ताबडतोब कारवाई केली जाईल.
-एस.डी झगडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग

