लॉकडाऊन’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या कुटुंबाचा पुणे-मुंबई प्रवास

0 झुंजार झेप न्युज

लॉकडाऊनच्या काळातही वाधवान कुटुंबाने रितसर परवानगी घेत प्रवास केल्याने आधीच वाद निर्माण झाला असताना असाच अजून एक  प्रकार समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदाराच्या भावाने लॉकडाउनच्या काळात पुणे-मुंबई प्रवास केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी हा प्रवास केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नितीन भोसले यांनी प्रवासासाठी प्रांताधिकाऱ्यांकडून पत्र मिळवलं होतं. हे पत्र दाखवूनच त्यांनी हा सगळा प्रवास केला. पण प्रांताधिकाऱ्यांनी आपण असं कोणतंही पत्र दिलं नव्हतं असं सांगितलं आहे.
अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी ८ एप्रिल रोजी पुणे-मुंबई असा प्रवास केला होता. आपल्या नातेवाईकाला घेऊन त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर ते मुंबईमधील वांद्रे पूर्व इथपर्यंत हा प्रवास केला. महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास करण्यासाठी मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांचं पत्र उपलब्ध होतं असा दावा त्यांनी केला आहे. या पत्रात चौघेजण प्रवास करत असून गरज लागल्यास त्यांना पेट्रोल, डिझेल पुरवण्यात यावं अशी स्पष्ट माहिती लिहिण्यात आली होती. तसंच गाडीचा क्रमांकही देण्यात आला होता. पण संदेश शिर्के यांनी आपण असं पत्र दिलं नसल्याचं म्हटल्याने प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
आपण हे पत्र दिलेले नाही. मी केलेल्या स्वाक्षरीचा स्कॅन करुन गैरवापर करण्यात आला आहे. जो कर्मचारी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं संदेश शिर्के यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल भोसले यांच्यासह त्याचं पत्नी आणि इतर १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.