गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला बाजार आजपासून बंद

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात विविध भागात पोलिसांनी कडक निर्बध घातले आहेत.
त्या भागात पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील 60 ते 70 टक्के अडते, व्यापारी, कामगार, टेम्पोचालक राहत आहेत. कोरोना विषाणूंच्या वाढता धोका लक्षात घेऊन मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा बटाटा व केळी बाजार शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बाजार समिती प्रशासनाने संबधित संघटनांना पत्राद्वारे कळविले आहे.
पोलीस प्रशासनाने शहरातील काही भाग सील केला आहे. अशा परिस्थितीत संबंधित भागात येणाऱ्या बाजारात काम करणे योग्य ठरणार नसल्याचे निवेदन बुधवारी अडते असोसिएशन आणि कामगार संघटनेकडून बाजार समितीला देण्यात आले होते. त्यांनतर बाजार समिती प्रशासन आणि मार्केट यार्डातील विविध संघटनांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर बाजार समितीकडून शुक्रवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे बाजार घटकांना कळविले आहे.
याबाबत कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, शहरात सध्या करोनाचा संसर्ग वाढत आहे. कामगार, हमाल, टेम्पोचालक करोना संसर्गामुळे भयभीत झाले असून या परिस्थितीत काम करणे शक्य नाही. त्यामुळे शुक्रवार पासून कामगार संघटनेचा कोणताही कामगार कामावर उपस्थित राहणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजार पुन्हा सुरू करण्यात यावा. तसेच भाजीपाला विक्रीची पर्यायी व्यवस्था बाजार समितीकडून शहरात करण्यात यावी. त्यामुळे शहरात भाजीपाल्याची टंचाई भासणार नाही.
भाजीपाल्याचे उपबाजार आणि भुसार बाजार सुरू राहणार
बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील अन्न धान्याचा गूळ भुसार बाजार सुरळीत सुरू राहणार आहे. तसेच बाजार समितीचे मोशी, खडकी, उत्तमनगर उपबाजार नियमित सुरू राहणार आहेत. या बाजारातून शहराला भाजीपाल्याचा पुरवठा होईल. तसेच मांजर उपबाजार सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.