चिंचवड विधानसभा मतदारसंघात औंध रुग्णालय आणि सांगवी येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू होणार

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोन ठिकाणी शिवभोजन योजनेच्या केंद्रांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील औंध जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय आणि सांगवीतील गंगानगर येथे हे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना स्वस्त दरातील जेवण मिळावे, यासाठी येथे शिवभोजन योजना केंद्र सुरू करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.  जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी या दोन्ही केंद्रांना ग्रीन सिग्नल दिले असून, हे दोन्ही केंद्र तातडीने कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

 राज्य सरकारने जानेवारी महिन्यांपासून राज्यात शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेच्या प्रत्येक केंद्रातून दहा रुपयांमध्ये जेवणाची थाळी देण्यात येत आहे. प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी किमान 75 आणि कमाल 150  थाळींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच मागणीनुसार वाढवून किमान 75 आणि कमाल 200 थाळी इतके वाढविण्यात येते.

या योजनेला सुरूवात केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये 4 ठिकाणी शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. आता राज्य सरकारने या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोन शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. हे दोन्ही केंद्र चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील औंध जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय आणि सांगवीतील गंगानगर, सर्व्हे क्रमांक 10/1/बी, शॉप नंबर 6 या दोन ठिकाणी शिवभोजन योजना केंद्र सुरू करण्यास जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. या दोन्ही शिवभोजन केंद्रांना दिवसाला 150 थाळींची मर्यादा आहे. औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना याठिकाणी स्वस्तात जेवण मिळणार आहे.

 अशी आहे शिवभोजन थाळी?
-30  ग्रॅमच्या दोन चपात्या
– 100 ग्रॅमची एक वाटी भाजी
– 150 ग्रॅमचा एक मूद भात
– 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी 10 रुपयात देण्यात येईल. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या थाळीसाठी 5 रुपये आकारण्यात येत आहे. शिवभोजनाची ही स्वस्तातील थाळी दुपारी 12 ते 2 या कालावधीतच मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.