चालक, वाहक पदी निवड झालेल्या 236 महिलांचे प्रशिक्षण सुरू करुन त्यांना 6800 रुपये विद्यावेतन द्या, इंटकची मागणी

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

चालक, वाहक पदी निवड झालेल्या 236 महिलांचे प्रशिक्षण सुरू करुन त्यांना 6800 रुपये विद्यावेतन द्या, इंटकची मागणी


मुंबई : एसटीतील महिला चालक तथा वाहक प्रशिक्षणार्थींना 6800 रूपये विद्यावेतन द्या, तसेच चालक तथा वाहक पदातील 3200 प्रशिक्षणार्थींची स्थगिती मागे घ्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने एसटी महामंडळाकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळसेवा भरती सन 2019 अन्वये 4500 चालक तथा वाहक पदात निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महिला आरक्षणाव्दारे 215 चालक तथा वाहक पदी महिला तसेच आदिवासी समाजातील 21 अशा 236 महिला चालक तथा वाहक पदात प्रशिक्षण घेत होत्या. परंतु त्या महिलांचे टाळेबंदीच्या आधी प्रशिक्षण थांबवण्यात आले. परिणामी त्या महिलांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

सध्या कोरोनाच्या या महाभयंकर काळात इतर काम देखील मिळत नाही. त्यामुळे त्या महिलांच्या प्रशिक्षणावर घातलेली स्थगिती मागे घेऊन प्रशिक्षण कालावधीत किमान वेतन कायदा आणि शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार 6800 रूपये विद्यावेतन देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

याबाबत बोलताना महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले की, सदर भरती अंतर्गत महिला उमेदवारांकरता त्यांची निवड झाल्यास अवजड वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना प्राप्त झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळातर्फे एक वर्षे अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन सरकाने केली होती. यासोबतच सर्व महिला उमेदवारांचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा नियमित परवाना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार त्यांची वाहन चालन चाचणी घेण्यात येऊन सदर चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांना जाहिरातीत नमूद केलेल्या वेतनश्रेणीमध्ये नेमणुका देण्यात येईल, अशी पात्रता ठरवण्यात आली होती.

त्यानुसार महिला आरक्षणाद्वारे 215 चालक तथा वाहक पदी महिला उमेदवारांची तसेच अदिवासी समाजातील 21 अशा एकूण 236 महिलांची निवड करण्यात आलेली आहे. एस.टी. महामंडळामध्ये चालक तथा वाहक पदात पहिल्यांदाच महिला उमेदवारांना 23 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्य सभागृह पुणे येथे तत्कालिन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आलेले होते. परंतु एसटी महामंडळाने सदर महिला चालक तथा वाहक उमेदवारांना प्रशिक्षण सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत विद्यावेतन दिलेले नाही. तसेच एसटीमहामंडळात पहिल्यांदाच चालक तथा वाहक पदामध्ये महिला उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार 48 दिवसाच्या पुरुष चालकांना देण्यात येणारे विद्यावेतन लागू करणे अन्यायकारक असून माणुसकीला काळीमा फासणारे आहे.

सध्या राज्य परिवहन महामंडळात प्रति दिन प्रशिक्षणार्थीना 5 रुपये विद्यावेतन दिले जाते. किमान वेतन कायदा 1948 शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अन्वये रा.प. महामंडळातील अर्धकुशल तांत्रिक व्यवसायीक आणि आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांना एक वर्षे प्रशिक्षण कालावधीत किमान वेतन मुळ आणि अधिक विशेष भत्ता मिळून येणाऱ्या रकमेच्या 70 टक्के रक्कम विद्यावेतन म्हणून दिले जाते. सध्या शासनाने परिमंडळ 1 करता रूपये 6803.30 तर परिमंडळ 2 करता रुपये 6663.30 इतके विद्यावेतन दिले जात असल्याचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

सध्या सरळ सेवा भरती 2019 अंतर्गत 236 महिला चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना कोणतेही विद्यावेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. याशिवाय 5 रुपये प्रतिदिन एक वर्षे प्रशिक्षण करण्यास विद्यावेतन देणे किमान वेतन कायदा व शिकाऊ उमेदवारी कायदा यामधील तरतुदींशी विसंगत आहे. सदर परिस्थितीत अत्यंत हालाखीचे जीवन जगण्याची वेळ गाजावाजा करून चालक तथा वाहक पदात भरती झालेल्या महिला प्रशिक्षणार्थीवर आलेली असून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी संघटनेकडून चालक तथा वाहक पदातील 3200 प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणाची स्थगिती मागे घेऊन प्रशिक्षण सुरू करावे.


महिला चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत 6800 रूपये विद्यावेतन द्यावे. राज्य संवर्ग 150 व 82 अधिकारी पदातील प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणाची स्थगिती मागे घेऊन प्रशिक्षण सुरू करावे. महिला चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षणार्थींना अवजड वाहन चालविण्याचा परवाना काढून द्यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षणार्थींना ज्या जिल्हातील रहिवासी आहेत त्या विभागात प्रशिक्षण द्यावे. महिला चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षणार्थीना विशेष बाब म्हणून 6800 रूपये विद्यावेतन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले.

 Follow us in-

Instagtam-@zunjarzep

Twittr-@झुंजार झेप 

Fecebook-@zunjarzep


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.