#breking news #Oxygen shortage | राज्यातील 'श्वास' कोंडी कधी फुटणार?

0 झुंजार झेप न्युज

  रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

Oxygen shortage | राज्यातील 'श्वास' कोंडी कधी फुटणार?



दोन मिनिटे नाकपुड्या आणि तोंड दाबलं तर सर्वसामान्यांना गुदमरल्यासारखं होतं. अशाच पद्धतीचा अनुभव सध्या काही कोरोनाबाधित रुग्णांना अनुभवायास मिळत आहे, त्याकरिता त्यांना लागणारा 'प्राणवायू' मिळण्याच्या टंचाईच्या तक्रारी वाढतच आहे. राज्य सरकारला आताही श्वास कोंडी फोडण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार असून याकरिता शासनाने रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे 'ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे रुग्णालयांना नक्की किती ऑक्सिजनची गरज आहे हे कळणार असून त्याप्रमाणे पुढचे नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे आजच्या घडीला प्राणवायूचा साठा समाधानकारक असून कोणतीही टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजरात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकाराना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील प्राणवायू घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम प्राणवायूची गरज भासते. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार ऍक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात प्राणवायूची गरज भासत आहे.

गेल्या काही दिवसात रुग्ण संख्या कोरोनाबाधितांची वाढत आहे, त्या प्रमाणात प्राणवायूची नितांत गरज रुग्णांना भासत आहे. काही रुग्णालयांना वेळेत प्राणवायूचा पुरवठा होता नसून त्याला वाहतूकव्यवस्था एक कारण पुढे केले जात आहे. तर काही ठिकाणी प्राणवायू सिलेंडरचे दर वाढीव प्रमाणात सांगितले जात आहे.

याप्रकरणी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट (ए एम सी) या डॉक्टरांच्या संघटेनचचे वेगळेच म्हणणे आहे. या संस्थेचे मुंबई आणि त्याच्या सभोवतील परिसरातील 12 हजार स्पेशालिस्ट डॉक्टर याचे सदस्य असून यामध्ये 1500 नर्सिंग होम चालकांचाही समावेश आहे. या संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक बैद सांगतात कि, "गेल्या 10 दिवसापासून ऑक्सिजनशी निगडित तक्रारी वाढल्या आहे. काही आमच्या संघटेनच्या सदस्यांकडूनही येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने काही दिवसापूर्वीच उत्पादकांनी भाव वाढविले असून रु. 6500 चा सिलेंडर, रु. 9000 ला सध्या मिळत आहे. तसेच खारघर येथील आमच्या  डॉक्टरांनी सांगितले कि त्यांचा व्हेंटिलेटरवरचा एक रुग्ण प्राणवायू संपला म्हणून दुसऱ्या रुग्णलयात हलविण्यात आला. तर अनेक ठिकाणी या प्राणवायूच्या टंचाईमुळे नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात आम्ही स्थानिक पातळीवरील महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बुधवारी 953.21 मेट्रिक टन रुग्णालयांना (कोविड आणि कोविड नसणाऱ्या) इतक्या प्राणवायूची गरज नोंदविण्यात आली असून 953.470 मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा उत्पादकांकडून करण्यात आला आहे. शिवाय या रुग्णालयांकडे 458.63 मेट्रिक टन इतका प्राणवायूचा साठा अजूनही शिल्लक आहे, असे सांगण्यात आले आहे. या आकडेवारीवरून राज्यात सध्याच्या घडीला तरी प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित होत असताना दिसत असला तरी डॉक्टरांच्या समस्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना मात्र समाधानी नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे सांगतात कि, " प्राणवायूच्या सिलेंडरचा काळा बाजार सुरु आहे, चढ्या दराने याची विक्री सुरु आहे. अशा अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाने ज्या पद्धतीने कोरोनाच्या चाचणीचे दर निश्चित केले आहे. त्याप्रमाणे प्राणवायूचे दर निश्चित केले पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुण्यात याची सगळ्यात जास्त चणचण आहे, कारण या शहरात रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. शासनाने याच्यासाठी तोडगा काढला पाहिजे कारण भविष्यात हा प्रश्न गंभीर होऊ शकतो त्याकरिता आताच पावले उचलली पाहिजेत." 

काही दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80% व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील. यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60 % आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50% या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा.

"रुग्णालयांना किती प्रमाणात सध्या ऑक्सिजनची गरज आहे त्याची आम्ही रीतसर यादी आणि माहिती गोळा करूनठेवत आहोत. त्यामुळे नेमका राज्यात किती ऑक्सिजनची गरज आहे हे आमच्या लक्षात येणार आहे." असे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले, डॉ. पाटील ह्या राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालिका आहेत.


प्राणवायूची कमतरता राज्याच्या विविध भागात जाणवत असल्याच्या तक्रारी येत असून या सगळ्या परिस्थितीवर राज्याचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग लक्ष ठेवून आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार ऍक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर होत आहे, त्यानुसार सध्याच्या घडीला 890 मेट्रिक टन म्हणजेच दिवसाला 8 लाख 90 हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. भविष्यात ज्या पद्धतीने रुग्ण वाढतील त्याप्रमाणे आणखी प्रमाणात ऑक्सिजन लागण्याची शक्यता नाकारता येत नसून उत्पादकांना ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे.

Follow us in

Www.zunjarzep.in

Instagram-

https://instagram.com/zunjarzepnews?igshid=2d6usmsmid25

Twittr -

https://twitter.com/ZunjarZep?s=09


Fecebook-

https://www.facebook.com/zunjarzepnews/




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.