रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
अजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास
पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीआणि उपमुख्यमंत्रीअजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी पहाटे-पहाटेच दाखल झाले. अजित पवारांनी मेट्रोने संत तुकाराम नगर ते एचए कंपनीपर्यंत प्रवासही केला.
अजित पवार वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. अजितदादांचा दिवस लवकर उगवतो. त्यामुळे अनेक वेळा ते बैठकांसाठी नियोजित वेळी, किंबहुना त्याआधीच पोहोचतात. अजित पवार आजही पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडीला दाखल झाले होते. अजित पवार येणार म्हटल्यावर भल्या पहाटेच व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तयारी करुन ठेवलेली होती.
पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. बैठक झाल्यानंतर अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे निघाला. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी अजितदादांनी केली.
यावेळी अजित पवारांनी स्टेशनवर तिकीट विक्री कशी असेल, याची माहिती घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगरला मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन त्यांनी मेट्रो प्रवास केला. अजित पवार मेट्रोचालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौऱ्यात काही पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते.
पुण्यातील कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. दुपारी ही बैठक होणार आहे.
Follow us in
Instagram-
https://instagram.com/zunjarzepnews?igshid=2d6usmsmid25
Twittr -
https://twitter.com/ZunjarZep?s=09
Fecebook-
https://www.facebook.com/zunjarzepnews/

