निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद, दिवाळीच्या तोंडावर पॅकेजची घोषणा?
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा विशेष पॅकेज जाहीर करण्याबाबत एकमत झालं असल्यानं आज यावर महत्त्वाची घोषणा होऊ शकते.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी कोरोना संक्रमण काळामध्ये Coronavirus Pandemic) दिवाळीच्या (Diwali 2020) पार्श्वभूमीवर केंद्र सरकार विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा विशेष पॅकेज जाहीर करण्याबाबत एकमत झालं असल्यानं आज यावर महत्त्वाची घोषणा होऊ शकते.
अधिक माहितीनुसार, केंद्र सरकार 1.5 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत आहे. सरकारने बुधवारीच देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी आणखी 10 क्षेत्रांना उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) म्हणून 2 लाख कोटी रुपये देण्याच्या योजनेला मंजूरी दिली.
प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्हची घोषणा
सरकारने देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी दूरसंचार, वाहन आणि औषधांसह 10 प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेला बुधवारी मान्यता दिली. इतकंच नाही तर पुढच्या 5 वर्षांमध्ये या योजनेसाठी तब्बल 2 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या खास योजनेमुळे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, फार्मास्युटिकल्स, स्टील, वाहनं, दूरसंचार, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ, सौर फोटोव्होल्टिक आणि मोबाइल फोन बॅटरी अशा उद्योगांमध्ये गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.
वाढती मागणी आणि नोकर्यांवर लक्ष
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह इतर बड्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या योजनेवर अंतिम टप्प्यात चर्चा केली. या मदत पॅकेजची मागणी वाढवण्यासाठी आणि यातून बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
खरंतर, सरकारने मागच्या वर्षी मदत पॅकेजमध्ये छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला होता. पण कोरोनाच्या संकटामुळे या पॅकेजवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगामुळे आणि लॉकडाऊनच्या परिणामामुळे पहिल्या तिमाहीत 23.9 टक्क्यांची कमी झालं होतं.
दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.6 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मागच्या वर्षाच्या तुलनेत 8.6 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे सलग दोन तिमाहीत जीडीपी घसरल्यानं देश पहिल्यांदाच आर्थिक मंदीमध्ये अडकला आहे. खरंतर. दुसर्या तिमाहीच्या जीडीपीसाठी अधिकृत आकडेवारी येणं अजून बाकी आहे, पण केंद्रीय बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

