No title

0 झुंजार झेप न्युज

राज कपूर, देवानंद, मोहम्मद रफी यांनी ऋणानुबंध जपला, इंडस्ट्रीला आलेले अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणार : मुख्यमंत्री


फिल्म इंडस्ट्रीकडे केवळ करमणूक करणारे क्षेत्र म्हणून पाहिले जाते. पण रडविण्यापेक्षा हसविणे फार अवघड असते आणि ती ताकद या माध्यमात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : “माझे वडील बाळासाहेब हे एक नेते होते पण तेही एक व्यंगचित्रकार, कलाकारही होते. त्यांच्या कलेने, ब्रशने आपली ताकद वेळोवेळी दाखवून दिली होती. पूर्वीच्या प्रॉडक्शन हाऊसेस कलेचे काम करून घेण्यासाठी त्यांच्याकडे यायचे. मग ते राज कपूर, देवानंद असो किंवा दिलीप कुमार, राजेश खन्ना सारखे कलाकार आणि अगदी मोहम्मद रफी, मन्ना डे हे गायक तसेच चांगले संगीतकार यांची कायम आमच्याकडे ये-जा असायची. या सर्वांनी एक ऋणानुबंध जपला”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. चित्रपट क्षेत्राशीसंबधित वेबिनार कार्यक्रमात ते बोलत होते.

“या इंडस्ट्रीकडे केवळ करमणूक करणारे क्षेत्र म्हणून पाहिले जाते. पण रडविण्यापेक्षा हसविणे फार अवघड असते आणि ती ताकद या माध्यमात आहे. ‘मेरा नाम जोकर’मध्ये सगळ्यांना हसविणाऱ्या जोकरचे एक आयुष्य आहे, त्यालाही अश्रू येतात. त्याप्रमाणे या इंडस्ट्रीला येणारे अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणे गरजेचे आहे”, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.
“आपण नेहमीच सर्व प्रसंगात राजकीय नेत्यांच्या बरोबर असता, कोरोनासारख्या संकटात देखील सर्वच जण पुढे आले. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि इतर दिग्गज अभिनेत्यांना घेऊन एक सुंदर आणि प्रभावी जनजागृती फिल्म तयार केली”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं 

“फिल्म इंडस्ट्रीची गरज सर्वाना का लागते, कारण यातून काम करणारे जे कलाकार असतात त्यांना जनतेच्या हृदयात एक स्थान असते. हा एक उद्योग आहे असे आपण म्हणतो पण याचे उत्पादन काय आहे? फिल्म इंडस्ट्रीचे प्रॉडक्शन हे चांगला समाज घडविणे हे असू शकते. महाराष्ट्रात सगळं काही आहे. महाराष्ट्रात संस्कार, कौशल्य, जिद्द आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“जशी परवडणारी घरे ही संकल्पना आहे तसे परवडणारी सिनेमागृहे ही संकल्पना चांगली आहे. या उपक्रमाला कसे राबवायचे यावर अधिक विचार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक बळकट करून त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे ते करू. आज आपल्याकडे चित्रपट निर्मितीसाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टींसाठी परदेशात जायची गरज नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

“मध्येच चर्चा सुरु झाली की इथली चित्रपट सृष्टी उत्तर प्रदेशला नेणार म्हणून, तुमच्यात क्षमता असेल तर जरूर नेऊन दाखवा”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“आज महाराष्ट्रात चित्रपट निर्मिती होते तिचा दर्जा चांगला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान हवे, आपल्याला जागा हवी असेल त्यप्र्माने एक एक्शन प्लान बनवा. प्राधान्यक्रम ठरवा, आपण निश्चितपणे त्यावर काम करू. शेवटी हाही आमचा एक मोठा परिवार आहे. तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहात त्यामुळे त्यांना बळ देणे हे सरकारचे काम आहे”, अशी शाश्वती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.