सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवेश कधी? रेल्वेला आजही राज्य सरकारकडून बैठकीसाठी बोलावणे नाही

0 झुंजार झेप न्युज

 

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवेश कधी? रेल्वेला आजही राज्य सरकारकडून बैठकीसाठी बोलावणे नाही

आजपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 2773 लोकल धावताहेत. त्यामुळे राज्य सरकारने अचानक सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवेश द्यायचे आदेश दिल्यास रेल्वे तयार आहे अशी भूमिका रेल्वेकडून घेण्यात आली आहे.


मुंबई : राज्य आणि रेल्वेमधील विसंवाद दिवसेंदिवस ताणला जात असल्याचे बघायला मिळते आहे. रेल्वेने राज्य सरकारकडे एका संयुक्त बैठकीची मागणी केली होती. जी बैठक आज होणे अपेक्षित होते मात्र आज देखील राज्य सरकारकडून कोणतेही बोलवणे न आल्याने रेल्वे राज्य सरकारच्या प्रतीक्षेत असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे. या दोन्ही प्रशासनाच्या भांडणात प्रवाशांचे मात्र हाल होणे सुरूच आहे. राज्य सरकारच्या नाराजीनंतर रेल्वेने आपल्या संपूर्ण क्षमतेच्या 88 टक्के लोकल सेवा आजपासून सुरु केल्या आहेत, आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्णयाची आहे.

राज्य सरकारने 28 तारखेला रेल्वेला एक प्रस्ताव पाठवून त्यावर रेल्वेचा अभिप्राय मागितला होता. या प्रस्तावात प्रवाशांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी करून त्यांना वेळ मर्यादा देण्यात आली होती. राज्य सरकारच्या प्रस्तावावर रेल्वेने देखील 29 तारखेला आपला अभिप्राय राज्य सरकारला पाठवला होता. त्यामध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी यंत्रणा विकसित करावी, प्रत्येक तासाला महिला विशेष लोकल चालवणे व्यवहार्य नाही असे पत्राद्वारे कळवले होते. यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका संयुक्त बैठकीची मागणी रेल्वेने केली होती. मात्र 29 तारखेपासून आजतागायत राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा बैठकीसाठी बोलावणे आले नाही. त्यामुळे आम्ही सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान रेल्वेच्या अभिप्रायावर राज्य सरकार नाखुश असल्याचे काही मंत्र्यांनी थेट सांगितले होते. त्यामुळे राज्य सरकारला शह देण्यासाठी रेल्वेने दोन दिवसात मोठ्याप्रमाणात लोकलच्या फेऱ्या वाढवल्या. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण क्षमतेच्या 88 टक्के लोकलच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. आजपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 2773 लोकल धावताहेत. त्यामुळे राज्य सरकारने अचानक सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवेश द्यायचे आदेश दिल्यास रेल्वे तयार आहे अशी भूमिका रेल्वेकडून घेण्यात आली आहे.

गर्दी नियंत्रणासाठी एक बैठक व्हावी अशी मागणी रेल्वेने केली होती ज्याला राज्य सरकारने अजूनही उत्तर दिले नाही. गेल्या काही दिवसात जर ही बैठक झाली असती तर आतापर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी मिळाली असती. मात्र राज्य सरकार आणि रेल्वेच्या या विसंवादामुळे अजूनही सर्वसामान्य प्रवाशांना हाल-अपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.