मुंबई बाहेरील महापालिकांक्षेत्रात फटाकेबंदी नाही, मग BMC च्या फटाकेबंदीच्या निर्णयाने फायदा होईल का?

0 झुंजार झेप न्युज

 

मुंबई बाहेरील महापालिकांक्षेत्रात फटाकेबंदी नाही, मग BMC च्या फटाकेबंदीच्या निर्णयाने फायदा होईल का?

नवी मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली अशा सर्वच महानगरपालिकांनी ठाणे महानगरपालिके प्रमाणेच नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.


मुंबई : मुंबई महापालिकेने जरी सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांवर बंदी घातली असली तरी मुंबईच्या तिन्ही बाजूला असलेल्या महानगरपालिकांमध्ये फटाक्यांवर बंदी नसल्याने मुंबई महापालिकेच्या फटाके बंदीचा किती फायदा होईल याबाबत शंका आहे. कारण मुंबईच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल असे चित्र आहे.

कोरोना हा श्वसनाचा आजार असल्याने यावर्षी फटाके फोडू नये असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर मुंबई महानगरपालिकेने थेट सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. यामुळे प्रदूषणात कमी होईल आणि कोरोनाचा प्रभाव पडणार नाही असे अनेकांचे मत आहे. मात्र मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील एकाही महानगरपालिकेने बंदी घातलेली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाने देखील असे काही आदेश काढले नाही.

नवी मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली अशा सर्वच महानगरपालिकांनी ठाणे महानगरपालिके प्रमाणेच नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारचे थेट आदेश महानगरपालिकांनी किंवा जिल्हा प्रशासनाने काढलेले नाहीत. सध्या जरी या महानगरपालिकांमध्ये covid-19 च्या रुग्णांची संख्या कमी असली तरी मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्हा देखील राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या पैकी दुसऱ्या क्रमांकावर होता.


तर दुसरीकडे ठाण्यातील कोपरी येथे असलेल्या फटाका मार्केटमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी फटाक्यांसाठी गर्दी होत आहे. कोपरी येथील मार्केटमध्ये सर्व प्रकारचे फटाके हे घाऊक दराने मिळत असल्याने इथे व्यापाऱ्यांसोबत अनेक नागरिक देखील फटाके खरेदीसाठी येतात. फटाके खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी फटाके फोडण्यास एक प्रकारे समर्थन दिले आहे. कमी आवाजाचे आणि कमी प्रदूषण करणारे फटाके आम्ही विकत घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


राजस्थान सारख्या राज्याने दिवाळीपूर्वी अनेक दिवस आधी फटाके बंदीचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात देखील हा निर्णय होण्याची अपेक्षा असतानाच मुख्यमंत्र्यांनी केवळ आवाहन केले. मात्र मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी सजगता दाखवत थेट फटाके फोडण्यास बंदीचा निर्णय जाहीर केला. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या आसपास असलेल्या शहरांमध्ये फटाके फोडले गेल्यास मुंबईतील बंदीचा किती फायदा होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.