11 डिसेंबर रोजी दवाखाने बंद राहणार; आएमएची राष्ट्रव्यापी बंदची हाक
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे.
मुंबई: केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. यावेळी त्यांनी उद्या दिवसभर सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचं जाहीर केलं असून डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे. त्यामुळे उद्या रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
आयएमएने एक पत्रक काढून उद्या 11 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्या सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे.
या कारणासाठी बंद
>> आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुध्द बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.
>> आएमएचा विरोध आयुर्वेदाला नाही. पण वैद्यकीय शाखेची सरमिसळ करून होत असलेल्या ‘मिक्सोपथी’ला आहे.
>> सरकारने ही सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी
>> राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या चार समित्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत.
>> या आंदोलनात राज्यातील आयएमएच्या २१९ शाखांमधील ४५००० डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण 1 लाख 10 हजार डॉक्टर्स सहभागी होतील.
>> मेडिकल स्टुडंट्स नेटवर्क आणि आएमएच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एबीबीएसचे शिक्षणारे महाराष्ट्रातील 36 सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 15000 वैद्यकीय विद्यार्थी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होतील.
>> राज्यातील खासगी आणि सरकारी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे 15000 विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

